esakal | गडचिरोली जिल्ह्यात नद्याच नाही तर नालेसुद्धा अडवतात लोकांची वाट
sakal

बोलून बातमी शोधा

Nalla

तालुक्‍यात गेली पंधरा दिवस संततधार पाऊस झाल्यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशावेळी गर्देवाडा गावाच्या नागरिकांना नाल्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

गडचिरोली जिल्ह्यात नद्याच नाही तर नालेसुद्धा अडवतात लोकांची वाट

sakal_logo
By
मनोहर बोरकर

एटापल्ली (जि. गडचिरोली) : अनेक भागांत पुरामुळे नद्या फुगल्या की, रस्ते बंद होतात. पण गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्‍यातील नालेसुद्धा नद्यांप्रमाणेच लोकांची अडवणूक करतात. काही उपाय नसल्याने या नाल्यांतून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो.

तालुक्‍यात गेली पंधरा दिवस संततधार पाऊस झाल्यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशावेळी गर्देवाडा गावाच्या नागरिकांना नाल्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पावसाने उसंत दिल्यानंतर जीवनावश्‍यक व इतर साहित्य खरेदीसाठी नागरिक गावाच्या बाहेर पडत आहेत. मात्र, गावातून बाहेर जाण्यास कोणताही पक्का रस्ता नाही व पाऊलवाटेत येणाऱ्या नदी, नाल्यावर पूल नसल्यामुळे अनेक गावांतील नागरिकांना तालुका मुख्यालयी येण्यास नदी-नाल्यांच्या वेगवान प्रवाहातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. 

सोमवारी (ता. ३१) ताडगुडा येथील डोलू उईके, मैंने नरोटी, रावजी नरोटी व चैतू नरोटी काही कामाने दोन दुचाकीने एटापल्लीस येत असताना एक दुचाकी गर्देवाडा नाल्यातून पुराच्या प्रवाहात वाहून जाताना मोठ्या कसरतीने जीव धोक्‍यात घालून बाहेर काढली. यापूर्वीही या नाल्यातून नागरिक वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

अवश्य वाचा- Video:राज्यमंत्री बच्चू कडूंनी अपघातग्रस्तांचे वाचविले प्राण... स्वतःच्या वाहनाने आणले रुग्णालयात
 

येथे किमान पूर परिस्थिती असताना तरी सुरक्षेची साधने पुरविणे किंवा बचाव पथक ठेवणे आवश्‍यक आहे. पण, यापैकी काहीच होत नाही. या भागातील नागरिकांना पक्‍का रस्ता व नदी, नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात अशाच प्रकारे जीवघेणा प्रवास करावा लागतो. त्यामुळे शासन व प्रशासनाने उपयोजना करून पक्‍के रस्ते व नदी, नाल्यावर पुलांची निर्मिती करण्याची मागणी केली जात आहे. 

अवश्य वाचा- आई मला वाचव, माकडाच्या पिलाची आर्त हाक... वाचा
 

अनेक ठिकाणी अडचणी...

केवळ एटापल्लीच नव्हे, तर जिल्ह्याच्या अनेक भागांत असे मोठमोठे नाले आहेत. या नाल्यांचा आकार एरवीही मोठा असतो. पावसाळ्यात हे नाले अधिकच फुगून वेगाने वाहत असतात. कित्येकदा आजारी रुग्ण, अत्यावश्‍यक काम यामुळे नागरिकांना हे नाले पार करण्याशिवाय पर्याय राहत नाही. येथील दुर्गम भागांत दळणवळणाची साधने अत्यल्प आहेत. त्यामुळे मोटारसायकलसारखी वाहने दोघा, तिघांच्या मदतीने अक्षरश: खांद्यावर घेऊन हे नाले पार करावे लागतात. 
 

loading image