esakal | मतदानाच्या वेळी ‘लंब्या लंब्या’ थापा आणि त्यानंतर ‘लाॅंग टर्म’ बेपत्ता
sakal

बोलून बातमी शोधा

मतदानाच्या वेळी थापा आणि त्यानंतर ‘लाॅंग टर्म’ बेपत्ता

मतदानाच्या वेळी थापा आणि त्यानंतर ‘लाॅंग टर्म’ बेपत्ता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

घाटंजी (जि. यवतमाळ) : अ‍ॅड. शिवाजीराव मोघे (Add. Shivajirao Moghe), देवराव गेडाम (Devrao Gedam), डॉ. संदीप धुर्वे (Dr. Sandeep Dhurve) या दमदार नेत्यांनी ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, त्या आर्णी-केळापूर मतदारसंघात घाटंजी तालुक्याचा समावेश आहे. हा तालुका यवतमाळ जिल्ह्यातील एक अत्यंत मागास तालुका म्हणून ओळखला जातो. एवढे मोठ्ठे पुढारी लाभूनही तालुक्याचा विकास का झाला नाही, हा प्रश्न पडला. त्याचे उत्तरही लगेच मिळाले. हा तालुका आदिवासीबहुल. भटक्या-विमुक्त जाती-जमातींचीही संख्या भरपूर. शेतीवरच उपजीविका करणारा हा वर्ग. आदिवासी, भटके विमुक्त आणि शेतकरी हे तर या देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीपासून उपेक्षेचे विषय आहेत. सरकार कोणतेही असो. या वर्गाचे सामूहिक शोषणच झाले आहे. निवडणुकीच्या वेळी विकासाच्या केवळ थापा मारायच्या आणि त्यानंतर फिरकूनही बघायचे नाही. हेच आजवर बहुतेक पुढाऱ्याचे ‘चारित्र्य’. जी शेती सर्वांना पोसते, त्या शेतीसाठी तीन टक्क्यांपुढे सिंचनक्षमता कुणालाच वाढविता आली नाही. उद्योगधंदे नाहीत. शिक्षणाच्या जेमतेम सोयी. आरोग्याच्या सुविधाही अपुऱ्या. अप्रगत असलेल्या या तालुक्याला प्रगतीकडे नेण्यासाठी ‘व्हिजनरी’ आणि प्रचंड इच्छाशक्ती असलेल्या नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची गरज आहे. (Ghatanji-taluka-backward-taluka-of-Yavatmal-district)

कळंबच्या चिंतामणीचे दर्शन घेऊन यवतमाळ गाठले. बसस्थानकावरून घाटंजीची बस पकडली. पावसामुळे रस्त्याच्या दुतर्फा हिरवे जंगल दृष्टीस पडत होते. दोन तासांच्या प्रवासानंतर घाटंजीत पोहोचले. ‘सकाळ’चे घाटंजीचे बातमीदार सागर सम्मनवार यांनी ‘रिसिव्ह’ केले. त्यांच्यासोबत कृषीविक्रेते गजानन कटकमवार व अभिजित सायरे होते. बसस्थानकालगत असलेल्या शिवम हॉटेलमध्ये नाश्ता केला. त्यानंतर शिवाजी चौक परिसराती शेतीनिष्ठ शेतकरी निजाम यांच्याकडे गेलो.

हेही वाचा: ...म्हणून महाविकासआघाडीतून बाहेर पडा आणि महायुतीचे सरकार स्थापन करा

चर्चेदरम्यान त्यांनी तालुक्यातील शेती व सिंचनाबाबत माहिती दिली. ते कोरडवाहू व सिंचनाची शेती स्वत:च करतात. त्यांच्याकडे खरिपाव्यतिरिक्त टरबूज, खरबूज, ऊस, हळद, फळभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. तालुक्यात कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असले तरी सिंचनाचा प्रश्न जटिल असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील धरणं, तलावांचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले असते तर परिसर सुजलाम् सुफलाम् झाला असता. वर्षाकाठी तीन पिके घेता आली असती, असे त्यांनी सांगितले.

ऐतिहासिक, पुरातन नगरी

घाटंजी हे यवतमाळ जिल्ह्यातील पुरातन शहर आहे. घाटी व अंजी या दोन्ही गावांच्या मध्यवस्तीत असल्याने या शहराचे नाव घाटंजी पडले. वाघाडी नदीच्या काठावर ब्रह्मलीन संतश्री मारोती महाराज यांचे देवस्थान आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गुरांचा मोठा बाजार येथे भरवला जातो. हा विदर्भातील नावाजलेला बैलबाजार आहे. राज्यासह देशातील विविध भागातून येथे गुरे विक्रीसाठी येतात. शहरालगत अंजी येथे ऐतिहासिक हेमाडपंथी शिल्पकलेचे श्री भगवान नृसिंहाचे पाषाणाकृती मंदिर आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे तर आंध्र प्रदेशातूनही येथे भाविक दर्शनाला येतात.

हेही वाचा: सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेने घातला १९ लाखांनी गंडा

उद्योगांची वानवा; मुख्य व्यवसाय शेतीच

तालुक्यात कपाशी, सोयाबीन, तूर ही पिके घेतली जातात. येथे सिंचनाचे क्षेत्र तीन टक्के आहे. तालुक्यात हिंदूंसह बंजारा, बौद्ध, भटक्या-विमुक्त समाजाची संख्या मोठी आहे. शेती कसणारा कुणबी समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. तालुक्यात १९६४ मध्ये नगर परिषदेची स्थापना झाली. घाटंजी शहर कोणत्याही मोठ्या रस्त्याला जोडलेले नाही. त्यामुळे शहरवजा मोठे खेडे, अशीच त्याची ओळख आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्ग नसल्याने येथे वाहतुकीची समस्या आहे. परिणामी उद्योगधंदे नाहीत. शेतीवरच सर्व मदार आहे. कपाशी हेच येथील मुख्य पीक आहे. घाटंजीला एमआयडीसीत एकही उद्योग नाही. नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. परंतु शेतीला सिंचनाची जोड नाही. मोठी बाजारपेठ नसल्याने विकासाच्या नावे बोंब आहे.

एकाही प्रकल्पाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. कोणत्याही धरणाचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेले नाही. आदिवासीबहुल तालुका असल्याने याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता नाही. मध्यंतरी यासंदर्भात अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन चर्चा केली. मुख्य कालवा व पाटसऱ्यांची दुरुस्ती करण्याची सूचना केली होती. त्यावेळी यावर काही प्रमाणात काम झाले. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष न दिल्याने ही समस्या जैसे थे राहिली. लोकप्रतिनिधींचा अधिकाऱ्यांवर वचक नसल्याने सिंचनाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. ठिबक व तुषार सिंचनासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या अनुदानाची पद्धत अतिशय क्लिष्ट आहे. यासाठी आधी शेतकऱ्यांना स्वतः खर्च करावा लागतो. अनुदानाचे पैसे वर्षानुवर्षे मिळत नाही.
- देवानंद पवार, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस (विदर्भ)
घाटंजी तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या शेतात विहिरी आहेत. परंतु वीज नसल्यामुळे शेतीला सिंचन करायचे कसे, हा प्रश्न आहे. वीज कनेक्शनची परवानगी दिली तर ते तुम्हीच टाकून घ्या. कंत्राटदाराचा जो खर्च येईल तो तुमच्या वार्षिक बिलातून कपात करून मिळेल, असे वीज वितरण कंपनीकडून सांगितले जाते. खरोखर शेतकरी एवढा सुखी असता तर लहान सहान गोष्टीसाठी त्याने एवढ्या खस्ता खाल्ल्या असत्या का, हा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत कनेक्शन मिळावे.
- केतन (भावेश) प्र. सूचक, शहराध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा, घाटंजी

हेही वाचा: राष्ट्रवादीचा कारभार मोठा असल्याने समन्वयाचा अभाव; मात्र, गटबाजी नाही

सिंचनविषयक योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरविणे हाच एकमेव पर्याय आहे. तालुक्यात बहुतांश अल्पभूधारक शेतकरी असून ते निसर्गावर अवलंबून आहेत. निसर्गाने पाठ फिरवली की शेतकरी अडचणीत येतात. त्यामुळे सिंचनविषयक सर्व योजना तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात याव्या. शंभर टक्के शेती सिंचनाखाली आणल्याशिवाय शेतकऱ्यांची दशा सुधारणार नाही.
- मनोज हामंद, शहर सरचिटणीस, भाजप

(Ghatanji-taluka-backward-taluka-of-Yavatmal-district)

loading image