esakal | Lockdown : एका अनोख्या लग्नाची गोष्ट अन् घडला लाखमोलाचा क्षण!
sakal

बोलून बातमी शोधा

marriage in lockdown.jpg

संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ येथील अभिमन्यू शेगोकार यांचा मुलगा विकास याचा विवाह शेलापूर बुद्रुक येथील बाजीराव मोरे यांची मुलगी शीतल सोबत ठरला होता.

Lockdown : एका अनोख्या लग्नाची गोष्ट अन् घडला लाखमोलाचा क्षण!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मोताळा (जि.बुलडाणा) : विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील लाखमोलाचा क्षण... हा सोहळा थाटामाटात साजरा करण्यासाठी वर आणि वधू पक्ष कोणतीच कसर ठेवत नाही. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्याने तालुक्यातील शेलापूर बुद्रुक येथील युवती व संग्रामपूर तालुक्यातील युवकाचा नोंदणी पद्धतीने विवाह लावण्यात आला. शेलापूर बु. ग्रामपंचायतीत मंगळवारी (ता.28) सदर शुभमंगल सोहळा पार पडला.

संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ येथील अभिमन्यू शेगोकार यांचा मुलगा विकास याचा विवाह शेलापूर बुद्रुक येथील बाजीराव मोरे यांची मुलगी शीतल सोबत ठरला होता. सदर विवाह सोहळा थाटामाटात करण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात असताना, कोरोनामुळे देशभर लॉकडाउन लागू झाला. दरम्यान, अनेक जण आपापल्या कुटुंबातील लग्न पुढे ढकलत असताना, शेगोकार व मोरे कुटुंबियांनी मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत आदर्श विवाह लावण्याचा निर्धार केला. वधू शीतल मोरे यांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरविलेले असल्याने वधूचे काका माजी सरपंच एकनाथ मोरे, समाधान मोरे यांनी सरपंच उमेश वाघ यांना माहिती दिली.

महत्त्वाची बातमी - धक्कादायक : ‘त्या’ कोरोना बाधितांच्या संपर्कात आले 39 पोलिस

सरपंच उमेश वाघ यांनी दोघांचा नोंदणी पद्धतीने विवाह लावण्याची संकल्पना मांडली. दोन्ही कुटुंबिय उच्चशिक्षित असल्याने त्यांनी तत्काळ पुढाकार घेतला. नवरदेव विकास व त्याच्यासोबत चार जण खासगी वाहनाने मंगळवारी नवरी मुलीच्या गावी आले. दरम्यान, शेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच उमेश वाघ, सचिव निता भोपळे यांनी वर-वधू आणि दोन साक्षीदार यांना सॅनिटायझर देऊन स्वागत केले. 

हेही वाचा - काय म्हणता, चक्क सावलीच होणार गायब!

सर्वांनी मास्क लावून सॅनिटायझरचा वापर करून तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत सदर शुभमंगल सोहळा पार पाडला. सरपंच उमेश वाघ यांच्या हस्ते नवरदेव-नवरीला विवाह नोंदणी प्रमाणपत्र व भेटवस्तूसाठी प्रत्येकी पाचशे रुपये देण्यात आले. या नोंदणी विवाह सोहळ्याचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.