कचारगड यात्रेला जाताय...या आहेत सुविधा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

सालेकसा तालुक्‍यातील प्रसिद्ध कचारगड यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी एसटी बसची सुविधा करण्यात आली आहे. कचारगड देवस्थानात सध्या कोया पुनेम यात्रेची तयारी सुरू आहे. गोंदिया बस आगारातर्फे गोंदिया-कचारगड विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. दर तासाला बसफेऱ्या सुरू केल्या आहेत.

गोंदिया : सालेकसा तालुक्‍यातील कचारगड येथे कोया पुनेम यात्रेची तयारी पूर्ण झाली असून गोंदिया आगाराने बससेवा सुरू केली आहे. ही यात्रा मंगळवारपर्यंत चालणार आहे. त्यामुळे या यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

म्हणून बसफेऱ्या सुरू

विशेष म्हणजे, मुंबई-पुणे व महाराष्ट्राच्या इतर भागातून तसेच भारताच्या उत्तरेकडील राज्यातून येणाऱ्या भाविकांना गोंदिया रेल्वेस्टेशन जवळचे आहे. मात्र, गोंदिया-कचारगड मार्गासाठी त्यांना सायंकाळपर्यंत रेल्वेगाडीची वाट बघत राहावी लागते. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने "दर तासाला एक बस' अशी विशेष व्यवस्था सुरू केली आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन गोंदिया बस आगार व्यवस्थापक पटले यांनी केले आहे.

देशातील मोठी गुहा

कचारगड भारतातील सर्वांत मोठी नैसर्गिक गुहा आहे. या गुहेचा गोंड संस्कृतीत सिंहाचा वाटा आहे. सुरुवातीच्या काळापासूनच कचारगड हे गोंडी संस्कृती, भाषा, रूढी-परंपरांचे माहेरघर ठरले आहे. गोंडी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी कचारगड प्रसिद्ध होते. आज गोंड व आदिवासी भाविक मोठ्या संख्येने कचारगड यात्रेत सहभागी होत आहेत.

मंगळवारपर्यंत यात्रा

आदिवासी नागरिक कोया पुनेम पौर्णिमेला पूजा-अर्चना करतात. त्यांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळातर्फे गोंदिया ते कचारगड दर एक तासाला बस सुविधा पुरवली आहे. मंगळवार(ता. 11)पर्यंत यात्रा सुरू राहणार असून बसफेऱ्याही सुरूच राहणार आहेत.

असे का घडले? : भंडारा-पवनी मार्गावर भीषण अपघात, कंटेनर-टेम्पोच्या धडकेत दोन ठार

 

बससेवांचा लाभ घ्या
गोंदिया, आमगाव बसस्थानक आणि दर्शनीयस्थळी यात्रेच्या फेऱ्यांबाबत बॅनर लावले आहे. कचारगड यात्रेतील भाविकांनी या बससेवांचा लाभ घ्यावा.
- प्रभुदास नंदलाल केळूत, व्यवस्थापक, गोंदिया बस आगार.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Going to Kachargarh Yatra ... These are the facilities