कोरोनावर मात करण्यात या जिल्ह्याला मिळाले ९० टक्के गुण अन् ठरला राज्यात अव्वल... 

corona hospital
corona hospital

गोंदिया : देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. जिल्ह्यातदेखील त्या प्रमाणात कोरोनाचे बाधित रुग्ण आढळून येत आहेत. तरीसुद्धा गोंदिया जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा दर महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 239 असून, त्यापैकी 214 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सहा रुग्णांना नागपूर येथे पुढील उपचारासाठी दाखल केले होते. यातील एक रुग्ण नागपूर येथून बरा होऊन घरी परतल्यामुळे एकूण बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 214 झाली आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 89.5 टक्‍के असून महाराष्ट्रात अव्वल असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी दिली. 

गोंदिया जिल्हा राज्याच्या टोकावर असून, मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेला लागून आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्धचा लढा जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. प्रशासनात काम करणाऱ्या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनुष्यबळाची कमतरता असूनही अतिशय मेहनत घेऊन हे कार्य केले आहे. आरोग्य विभाग, पोलिस विभाग, महसूल विभाग तसेच इतर महत्त्वाच्या विभागांनी विशेष नियोजन करून दक्षता घेऊन काम केले आहे. 

बाहेर राज्यातून किंवा जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर पोलिस आणि आरोग्य विभागाची नजर आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची ताबडतोब तपासणी करून त्यांची माहिती घेणेदेखील महत्त्वाचे काम आहे. तसेच संशयितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करून त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करणे किंवा गृहविलगीकरण करणे या गोष्टींचे नियोजन महत्त्वाचे ठरले आहे. यानंतर रुग्णांवर त्वरित उपचार करणे, कंटेनमेंट झोनमध्ये ऍक्‍टिव्ह सर्व्हे करून आजाराची कोणत्याही प्रकारची लक्षणे असलेल्या नागरिकांची तसेच 60 वर्ष वयोगटातील व्यक्तींची देखरेख, फिव्हर क्‍लिनिकमध्ये येणाऱ्या नागरिकांचा पाठपुरावा आदी बाबींमुळे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 89.5 टक्‍के इतका आहे. 

जिल्ह्यातील प्रयोगशाळा चाचणी अहवालात बाधित 230 तर रॅपिड अँटिजन चाचणीत पाच रुग्ण आढळले. जिल्ह्यातील चार रुग्णांची चाचणी बाहेर जिल्ह्यात व राज्यात झाली. यामध्ये तीन रुग्णांची चाचणी नागपूर येथे तर एका रुग्णाची चाचणी बंगलोर येथे करण्यात आली आहे. या चारही रुग्णांचा समावेश जिल्ह्यात करण्यात आल्यामुळे एकूण बाधितांची संख्या 239 इतकी झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे आज, गुरुवारी एकही बाधित रुग्ण आढळला नाही. 
संपादन ः राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com