दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या चौघांना अटक, धारदार शस्त्रांसह ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त

मुनेश्‍वर कुकडे
Monday, 26 October 2020

गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार बालाजी कोकोडे हे पथकासह रात्री गस्तीवर होते. यावेळी त्यांना बालाघाट टी-पॉईंटकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावरील पुलाजवळ 6 जण संशयास्पदरित्या असल्याची गुप्त माहिती मिळाली.

गोंदिया : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहापैकी चार जणांना गोंदिया ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून धारदार शस्त्रे, दुचाकी, मिरचीपूड अन्य साहित्य, असा एकूण 71 हजार 215 रुपयांचा मुद्देमाव जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी (ता.25) पहाटे साडेतीनच्या सुमारास बालाघाट टी-पॉईंटकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर करण्यात आली.

शुभम नंदी (वय 24), ओंकार तांडी (वय 18), जितकुमार निशाद (वय 19), नीतेश गोस्वामी (वय 20, सर्व रा. भिलाई), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत, तर अन्य दोन आरोपी फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा - आठवणी विधानसभा निवडणुकीच्या : नागपुरात भाजपला धक्का देत काँग्रेसचे जबरदस्त कमबॅक, मंत्रिमंडळातही...

गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार बालाजी कोकोडे हे पथकासह रात्री गस्तीवर होते. यावेळी त्यांना बालाघाट टी-पॉईंटकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावरील पुलाजवळ 6 जण संशयास्पदरित्या असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता त्यांना 6 जण संशयास्पदरित्या रस्त्याच्या बाजूला उभे असल्याचे दिसले. पोलिसांना पाहून दोघेजण दुचाकीने पळून गेले. शुभम नंदी, ओंकार तांडी, जितकुमार निशाद, नीतेश गोस्वामी यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, कसून चौकशी केली असता, त्यांच्याजवळ एक 12 इंच लांबीचे धारदार शस्त्र, लोखंडी टॉमी, स्क्रू ड्रायव्हर, मिरची पूड आदी साहित्य आढळले. शिवाय कागदपत्रे नसलेली दुचाकी, सिगारेट, गुटखा आदी साहित्यदेखील होते. याबाबत पोलिसांनी चारही आरोपींना विचारले असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. 

दरम्यान, दरोडा टाकण्याच्या उद्देशाने सगळे आरोपी आढळल्याने पोलिस हवालदार बालाजी कोकोडे यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. आरोपींकडून 71 हजार 215 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फरार दोन आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सडमेक करीत आहेत.

हेही वाचा - आई झाली निष्ठूर; नवजात बाळाला नाल्यात फेकले; परिसरात वेगळीच कुजबूज

गळा आवळून सासूचा खून, सुनेला अटक -

आमगाव : क्षुल्लक कारणातून झालेल्या भांडणात सुनेने सासूचा गळा आवळून खून केला. ही घटना तिगाव येथे शुक्रवारी (ता.23) दुपारी 3 च्या सुमारास घडली. तिरणबाई राधेलाल बारेवार (वय 68), असे मृताचे, तर डिलेश्‍वरी बारेवार (वय 23, दोघीही. रा. तिगाव), असे आरोपी सुनेचे नाव आहे. पोलिसांनी सुनेला अटक केली आहे. 

घरगुती कारणावरून शुक्रवारी (ता.23) सासू तिरणबाई व सून डिलेश्‍वरी यांच्यात भांडण झाले. या भांडणात संतप्त झालेल्या सुनेने घरात दुपारी झोपी गेलेल्या तिरणबाईचा उशीने नाक व तोंड दाबला. त्यानंतर हाताने गळा दाबून खून केला. मात्र, ही बाब घटनेच्या दिवशी उघडकीस आली नाही. तिरणबाईला अंत्यसंस्कारासाठी नदीवर घेऊन जाण्याची तयारी सुरू असताना घराच्या लोकांनी तिची अंघोळ घातली असता तिरणबाईचा गळा दाबलेल्या अवस्थेत आढळून आला. 

हेही वाचा - बापरे! नागपुरात ‘चौकीदार चोर है’चा मुद्दा ऐरणीवर; एक घटना ठरली कारणीभूत

मृत तिरणबाईची मुलगी सुनीता बाबूलाल कावळे (वय 45, रा. श्रीनगर, गोंदिया) हिच्या लक्षात ही बाब आली. तिने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार, मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी सुनेला विचारले असता तिने सासूचा गळा आवळून खून केल्याचे कबूल केले. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी सून डिलेश्‍वरी बारेवार हिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gondia police arrested four robber