शहिदाचा सरकारला विसर; ५६ वर्षांनंतरही शहीद शासनाच्या लेखी विस्मृतीत

चेतन देशमुख
Wednesday, 27 January 2021

युद्धात देवीदास यांना वीरमरण आल्याची माहिती अंजनाबाईंना मिळताच त्यांच्यावर आभाळच कोसळले. मोठा मुलगा विजय तीन वर्षांचा तर लहाना संजय अवघ्या सहा महिन्यांचा होता. अशा कठीण प्रसंगी अंजनाबाईने दोन मुलांचा सांभाळ करून त्यांना उच्चशिक्षित केले.

यवतमाळ : देशासाठी शहीद झालेल्या जवानांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होतात. ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत शहिदाला अखेरचा निरोप दिला जातो. मात्र, अनेकदा त्यांचं साधं स्मारकही उभारलं जात नाही. अशीच काहीशी स्थिती १९६५ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात काश्‍मीरच्या सीमेवर शहीद झालेल्या देवीदास तायडे यांची आहे. ५६ वर्षांनंतरही जिल्ह्यातील पहिले शहीद शासनाच्या लेखी विस्मृतीत गेले आहे.

दारव्हा तालुक्‍यातील बोरी (अरब) येथील देवीदास सेवकदास तायडे यांचा जन्म ९ सप्टेंबर १९३५ रोजी झाला. वयाच्या १९ व्या वर्षी ९ सप्टेंबर १९५३ रोजी सैन्यात दाखल झाले. मध्यप्रदेशातील सागर येथील महार रेजीमेंटमध्ये त्यांची नियुक्ती झाली. सैनिकी शिस्तीत वाढलेल्या देवीदास यांच्या नसानसांत देशभक्ती ओतप्रोत भरली होती. त्याच काळात भारत-पाक युद्धाचे ढग जमू लागले.

जाणून घ्या - VIDEO : '...तर काँग्रेस अन् राष्ट्रवादीमधील अर्धे नेते तुरुंगात जातील'

१९६५ साली झालेल्या भारत-पाक युद्धात काश्‍मीर सीमेवर १२ सप्टेंबरला त्यांना वीरगती आली. ते यवतमाळ जिल्ह्यातील पहिले शहीद होते. आज त्यांना वीरगती प्राप्त होऊन ५६ वर्षांचा काळ उलटला. मात्र, अजूनही या वीर जवानाचे साधे स्मारकही उभारले नाही. त्यांनी गुजरात, गोवा, राजस्थान, लद्दाख, काश्‍मीर या ठिकाणी आपली सेवा दिली.

युद्धात देवीदास यांना वीरमरण आल्याची माहिती अंजनाबाईंना मिळताच त्यांच्यावर आभाळच कोसळले. मोठा मुलगा विजय तीन वर्षांचा तर लहाना संजय अवघ्या सहा महिन्यांचा होता. अशा कठीण प्रसंगी अंजनाबाईने दोन मुलांचा सांभाळ करून त्यांना उच्चशिक्षित केले.

अधिक माहितीसाठी - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

नागरिकांनाही पडला विसर

जिल्ह्यातील पहिले शहीद हे बोरी (अरब) येथील आहेत. असे असतानाही अनेकांना याची माहिती नाही. तालुकास्तरावरही कुठेही ठळकपणे याची नोंद घेतली गेली नाही. त्यामुळे नागरिकांनाही या महान वीरपुरुषाचा विसर पडला आहे. वयाच्या तिशीत देशासाठी प्राण देणाऱ्या या शहिदाच्या स्मृती जागवायल्या हव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government forgets the sacrifice of martyr Devidas Tayde