"कावून मजाक करता जी सायेब, मले इंग्लिस नाई ये होऽऽ! तुमीच सांगा कमोडीटी का व्हय ते!"

आनंद चिठोरे 
Wednesday, 13 January 2021

असाच प्रकार शासकीय धान्य खरेदी-विक्रीकरिता सुरू असताना तूरविक्री करण्याकरिता शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे नोंदणी केली असता त्यांना यशस्वीरीत्या नोंदणी झाल्याचा संदेश त्यांच्या मोबाईलवर आला तो इंग्रजीत.

पथ्रोट (जि. अमरावती) ः मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या पक्षाची महाराष्ट्रात सत्ता आहे. असे असतानाही सरकारकडून शेतकऱ्यांना शेतमालाच्या नोंदीबाबतचे मॅसेज हे इंग्रजीतून करून त्यांची थट्टा केल्याचा प्रकार पथ्रोट सर्कलमध्ये समोर आला आहे. कोरोनाच्या काळात शासकीय-निमशासकीय व खासगी क्षेत्रात ऑनलाइन प्रक्रियेला ऊत आला आहे. शाळेतून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण असो की शासनाचे निर्णय किंवा माहिती असो, प्रत्येकच विषय आता थेट ऑनलाइन स्वरूपात नागरिकांपर्यंत पोहोचवणे सुरू आहे. 

असाच प्रकार शासकीय धान्य खरेदी-विक्रीकरिता सुरू असताना तूरविक्री करण्याकरिता शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे नोंदणी केली असता त्यांना यशस्वीरीत्या नोंदणी झाल्याचा संदेश त्यांच्या मोबाईलवर आला तो इंग्रजीत. ज्यात सुरुवातीला फॉर्मर नेम, कोड नंबर, लॅंड हेच बीन एडिट सक्‍सेसफुली फोर कमोडिटी रेड ग्राम (तूर) इन सीजन : 20 के विथ लेलॅंड एरिया ऑफ ट्‌वेंटी ऑफ 5.732 एकर, असा उल्लेख करण्यात आला. परंतु इंग्रजीत असणारा हा संदेश शेतकऱ्यांना समजत नसल्याने त्यांची खूपच पंचाईत होत आहे. 

जाणून घ्या - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली

एकीकडे मराठी भाषेचा अभिमान बाळगून कायदे करणारे सरकार मात्र स्वतः त्या कायद्याची अंमलबजावणी करताना विसरून गेल्याचे या मेसेजवरून दिसून येत आहे. न्यायालयीन तथा बॅंकेची भाषा मराठीत करण्यात आल्यावर शासन मात्र स्वतःचे निर्णय इंग्रजी माध्यमातून शेतकऱ्यांवर लादून त्यांची थट्टा उडविण्यात दंग आहे. ऑनलाइन शॉपिंग सेंटरच्या कार्यालयाची भाषा मराठीत व्हावी म्हणून नुकतेच त्यांच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केल्याचे उदाहरण ताजे आहे.

तूर नोंदणी संदर्भात इंग्रजीतला हा मॅसेज मला आल्यावर तो कळला नसल्याने मी नऊ शेतकऱ्यांजवळ जाऊन त्याचा अर्थ विचारला. परंतु त्यांनासुद्धा तो सांगता आला नाही. दहाव्यांदा एका शिक्षकाकडून तो समजून घेतला. इंग्रजीतील संदेश मराठीत करण्यात सरकारला जर खर्च येत असेल तर तो मी त्यांना द्यायला तयार आहे. परंतु त्यांनी अशाप्रकारे शेतकऱ्यांची थट्टा करू नये.
-अरविंद लिल्हारे, 
शेतकरी शिंदी.

नक्की वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

मराठी भाषेचा प्रचार करून सत्ता मिळविणाऱ्यांनी शेतकऱ्यांना इंग्रजीत संदेश पाठवून त्यांची चेष्टा करू नये, अन्यथा मनसेच्या पद्धतीने आंदोलन करून आम्ही सरकारला तो इंग्रजीतला संदेश मराठीत करण्यास भाग पाडू.
-राज पाटील, 
जिल्हा उपाध्यक्ष मनसे.

संपादन - अथर्व महांकाळ  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government sent massages to Farmers in English in Amravati Latest News