ग्रेट! आठवीच्या विद्यार्थ्याने बनविले धान्यसफाईचे यंत्र; इनोव्हेशन अवॉर्डसाठी झाली निवड 

रवींद्र शिंदे
Thursday, 22 October 2020

गरीब-छोटे शेतकरी व गृहिणींसाठी ही चाळणी अतिशय लाभदायक आहे. ही चाळणी तयार करण्यासाठी फक्त पाचशे रुपये खर्च येतो. अत्यंत स्वस्त व मस्त असे हे उपकरण आहे. यात धान्य चाळताना चाळणी हातात धरावी लागत नाही.

यवतमाळ : येथील केंद्रीय विद्यालयात आठवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने सुगम धान्यसफाई यंत्र बनविले आहे. बोधिसत्त्व खंडेराव असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इग्नाइटेड माइंड चिल्ड्रेन क्रिएटिव्हिटी ऍण्ड इनोव्हेशन अवॉर्ड २०२० या स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. 

देशाच्या २२ राज्यांमधील जवळपास नऊ हजार विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यातून एकूण १५ विद्यार्थ्यांची या उपक्रमाकरिता निवड करण्यात आली. बोधिसत्वने ‘मेकॅनिकल सिव्ह’ या सुगम धान्यसफाई यंत्राची निर्मिती केली. यावर्षीच्या प्रशंसा पुरस्कारासाठी त्याची निवड करण्यात आली. या यंत्राद्वारे एक मनुष्य एका तासात साधारणपणे शंभर किलो धान्य चाळून स्वच्छ करू शकतो. यासाठी विजेची गरज पडत नाही.

शेतकऱ्याने लढविली शक्कल; शेतपिकांच्या सुरक्षेसाठी साडीचे कुंपण 
 

गरीब-छोटे शेतकरी व गृहिणींसाठी ही चाळणी अतिशय लाभदायक आहे. ही चाळणी तयार करण्यासाठी फक्त पाचशे रुपये खर्च येतो. अत्यंत स्वस्त व मस्त असे हे उपकरण आहे. यात धान्य चाळताना चाळणी हातात धरावी लागत नाही. त्यामुळे खांदे, पाठ व कमरेवर ताण पडत नाही. ती एका मजबूत मेटल स्टॅंन्डवर ठेवून फक्त सी-सॉ खेळल्यासारखी हलवावी लागते. चाळणीचा आकार व जाळी गरजेप्रमाणे बदलता येते. यापूर्वीही या चाळणीयंत्राला जिल्हा, राज्य व विभागीय पातळीवर बक्षिसे मिळालेली आहेत. 

खंडाळा- येलदरी घाटात ट्रॅव्हल्स उलटली; दोन ठार, १९ प्रवासी जखमी

साहित्य संमेलनात ४० महिलांना वाटप 

 

यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ४० महिलांना या चाळणींचे वाटप करण्यात आले होते. येत्या डिसेंबर महिन्यात सर्व यशस्वी विद्यार्थांचे प्रोजेक्‍ट अहमदाबाद येथे प्रदर्शित केले जाणार आहेत. या यशाबद्दल केंद्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक जितेंद्र रामटेके, शिक्षक गंगाधर भगत, निरंजन सैनी यांनी बोधिसत्वचे कौतुक केले आहे. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grain cleaner made by eight standard student; Selected for Innovation Award