हा तर महानायकाचा अपमान; पुतळ्याभोवती काटेरी झुडपे; उद्‌घाटनापूर्वीच प्रशासनाची अनास्था

grass is growing around statue of vasantrao naik in yavamal district
grass is growing around statue of vasantrao naik in yavamal district

पुसद (जि. यवतमाळ) : माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जन्मशताद्धी वर्षानिमित्त येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील वसंतराव नाईक स्मारकाची दुरवस्था झाली आहे. या पुतळ्याभोवती काटेरी झुडपे वाढली असून, स्मारकाच्या उद्‌घाटनापूर्वीच प्रशासनाच्या अनास्थेमुळे अशी दुरवस्था झाली आहे.

पुसद कर्मभूमी असलेल्या नाईक यांच्या गौरवशाली कार्यकर्तृत्वामुळेच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची पायाभरणी व उभारणी झाली. तब्बल एक तपाची त्यांची कामगिरी म्हणजे महाराष्ट्रासाठी सुवर्णकाळ ठरला. शेतकऱ्यांचे 'मसिहा' म्हणून त्यांना जनमानसात आदराचे स्थान आहे. म्हणूनच त्यांचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात सर्वाधिक पुतळे आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शासनाने जन्मशताब्दी वर्षानिमित्त 100 कोटींचा निधी मंजूर केला. त्यापैकी दहा कोटी रुपये खर्चून पुसद येथे भव्यदिव्य स्मारकाची उभारणी केली. त्यात सभागृहासह अद्ययावत वास्तू तयार केल्या. मात्र, तीन वर्षे लोटूनही ही वास्तू मागणी करूनही शासनाने वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानला सोपविली नाही. 

त्यामुळे या वास्तूकडे प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष झाले. अधिकृत उद्‌घाटनाआधीच या स्मारकाला बकाल स्वरूप आले आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला वसंतराव नाईक यांचा पुतळा स्मारकाच्या मोकळ्या जागेत धूळखात आहे. सभोवती काटेरी झुडपे आहेत. तयार केलेल्या उद्यानात झुडपे वनस्पती व गवत दाटल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. उभारलेल्या विविध कक्षांत श्‍वानांचा सर्रास वावर आहे. 

रात्रीच्या प्रहरी येथे अनेक दारुडे येतात व अवैध कामांना ऊत येतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन कर्मचाऱ्यांची देखरेखीसाठी नियुक्ती केल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात स्मारकाची देखभाल होत नसल्याने या स्मारकाची रया लयाला गेली. अद्ययावत व प्रशस्त सभागृह व इतर कक्षांची उपयोगिता होत नसल्याने स्मारकाचा उपयोग काय, असा प्रश्‍न वसंतराव नाईक यांच्या चाहत्यांना पडला आहे. 

यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या महनीय नेत्यांचे स्मारक अतिशय सुरेख व रमणीय असताना वसंतराव नाईक यांच्या स्मारकासाठी महाविकास आघाडी सरकारचा काणाडोळा का होत आहे, असा प्रश्‍न विचारला जात आहे. दरम्यान, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुसद येथील उपविभागीय अभियंता प्रकाश झळके यांनी विचारणा केली असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 

हस्तांतरण का नाही?

वसंतराव नाईक स्मारकाचे काम पूर्ण होऊन दोन वर्षे झालीत. परंतु, अद्यापही सक्षम संस्थेला ते हस्तांतरित करण्यात आलेले नाही. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद स्मारकाचे मेन्टेनन्स करण्यास तयार नाहीत. अशास्थितीत वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान यांनी ही जबाबदारी स्वीकारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना पुसदच्या तीनही आमदारांनी हस्तांतरण संस्थेकडे करून घेण्याची आवश्‍यकता आहे. शिवाय संरक्षक भिंत, जलकुंभ, प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते ही कामे पूर्ण करण्याची गरज आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com