मोठ्या ठिपकेदार गरुडाची अमरावतीच्या आकाशाला गवसणी, पहिल्यांदाच झाली नोंद

सुधीर भारती
Monday, 15 February 2021

यंदा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी पक्षीअभ्यासक प्रशांत निकम पाटील आणि संकेत राजूरकर यांना पक्षीनिरीक्षण करताना पोहरा मालखेड वनपरिक्षेत्रात ग्रेटर स्पॉटेड ईगल अर्थात मोठा ठिपकेदार गरुड या पक्ष्याचे दर्शन झाले.

अमरावती : जिल्ह्यातील मालखेड वनपरिक्षेत्रात मोठ्या ठिपकेदार गरुडाचे अस्तित्व टिपण्यात आले आहे. ग्रेटर स्पॉटेड ईगल असे इंग्रजी नाव असून यापूर्वी जिल्ह्यात या पक्षाची कधीही नोंद झाली नव्हती.

हेही वाचा - ‘मुलांनो, आम्हाला माफ करा; आमचे मृतदेह मेडिकल कॉलेजला दान करा’ अशी चिठ्ठी लिहून दाम्पत्याची...

यंदा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी पक्षीअभ्यासक प्रशांत निकम पाटील आणि संकेत राजूरकर यांना पक्षीनिरीक्षण करताना पोहरा मालखेड वनपरिक्षेत्रात ग्रेटर स्पॉटेड ईगल अर्थात मोठा ठिपकेदार गरुड या पक्ष्याचे दर्शन झाले. त्यांनी छायाचित्रण करून या पक्ष्याची अमरावतीमधील प्रथम नोंद केल्यामुळे अमरावतीच्या पक्षीयादीमध्ये मोलाची भर पडली आहे.

सुमारे 62 ते 72 सेंमी. लांबी असलेल्या या शिकारी पक्ष्याच्या पसरलेल्या पंखांची लांबी 5.25 ते 6 फूट एवढी प्रचंड असते. गर्द काळपट तपकिरी डोके आणि पंखांची किनार असणाऱ्या या पक्ष्याच्या शेपटीखाली असलेली इंग्रजी व्ही आकारातली पांढरी पिसे ही याची विशेष ओळख आहे. परंतु, अवयस्क गरुडमध्ये हे वैशिष्ट्य बरेचदा दृष्टीस पडत नाही. शरीर आणि पंखांवरील छोटे पांढऱ्या ठिपक्‍यांवरुन याला हे नाव प्राप्त झाले आहे.
क्‍लांगा क्‍लांगा असे शास्त्रीय नाव असणारा हा पक्षी मोठा चितळा गरुड या मराठी नावानेही ओळखला जातो. भारताच्या उत्तर भागात निवास करताना हा गरुड स्थानिक हिवाळी स्थलांतराच्या शेवटच्या टप्यात मध्य व दक्षिण भारतात येतो. भारतासह नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान आणि म्यानमार इत्यादी ठिकाणीही हा आढळतो. बेडकासारखे उभयचर आणि जलाशय व दलदलीच्या भागातील सरपटणारे प्राणी हे याचे खाद्य असून त्याकरिताच मोठ्या जलाशयाच्या ठिकाणी, दलदलीच्या प्रदेशात याचा मुख्य आढळ असतो. यासोबतच इतर शिकारी पक्ष्याचे खाद्य पळवणे, पाणकोंबडी सारखे काही पाणपक्षी हे याच्या खाद्याचा मुख्य स्रोत आहे. एप्रिल ते जून हा या पक्ष्याचा विणीचा हंगाम असून झाडाच्या टोकावर मध्यभागी खोलगट भाग असलेले याचे घरटे वाळलेल्या काटक्‍या आणि फांद्या यापासून तयार होते.

हेही वाचा - जेवणासाठी बाहेर गेलेल्या मुलाची २८ दिवासांनी फक्त मिळाली कवटी; टी-शर्ट बघताच आईने फोडला हंबरडा

केवळ व्याघ्र केंद्रित होऊ पाहणाऱ्या जंगलभ्रमंती ऐवजी आपल्या जवळच्या, आसपासच्या परिसरातील इतर निसर्ग घटक, वन्यजीवन, पक्षीजीवनाबद्दल आकर्षण आणि अभ्यास वाढल्यास पर्यावरणपूरक अशी सकारात्मक आत्मीयता निर्माण होऊ शकते अशी प्रतिक्रिया प्रशांत निकम पाटील यांनी व्यक्त केली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: greater spotted eagle found in malkhed of amravati