esakal | बंदी असतानाही बेकायदेशीर मार्गाने खुलेआमपणे होते विक्री; असा घडतोय प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

gutkha in mehkar.jpeg

डोणगाव येथे लॉक डाऊन च्या काळातही गेल्या काही दिवसापासून खुलेआम गुटख्याची विक्री सुरू होती.

बंदी असतानाही बेकायदेशीर मार्गाने खुलेआमपणे होते विक्री; असा घडतोय प्रकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मेहकर/डोणगाव (जि.बुलडाणा) : मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे बेकायदेशीर मार्गाने गुटखा विक्री सुरू असल्याच्या माहितीवरून बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाने आज (ता.10) सकाळी 9 वाजता डोणगाव येथे धाड टाकून जवळपास 96 हजार रुपयाचा गुटखा जप्त केला आहे. यासंदर्भात एका आरोपीला ताब्यात घेऊन डोणगाव पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

डोणगाव येथे लॉक डाऊन च्या काळातही गेल्या काही दिवसापासून खुलेआम गुटख्याची विक्री सुरू होती. यासंदर्भात बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाला माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख, पोलिस नायक लक्ष्मण कटक, रघुनाथ जाधव, विजय दराडे, श्रीकांत चिंचोले यांच्या पथकांनी गुप्त माहितीवरून डोणगाव येथील ताज स्वीट मार्ट सेंटरवर धाड टाकली असता या ठिकाणी शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखू मिश्रित सुगंधित गुटखा असल्याचे आढळून आले. 

आवश्यक वाचा - चिंताजनक! या जिल्ह्याच्या कोरोनामुक्तीच्या आनंदावर काही तासातच विरजन

दरम्यान यासंदर्भात नजर या नावाने असलेल्या तंबाखू मिश्रित गुटख्याचे जवळपास 371 पाकीट जप्त करण्यात आले जवळपास 96 हजार रुपये माल जप्त करून आरोपी शेख फहीम शेख कयूम याला ताब्यात घेऊन डोणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन विभाग यांना सूचना देण्यात आली आहे.

हेही वाचा - पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा सोडला वाऱ्यावर, जबाबदारीचे भानही विसरले

मेहकर तालुक्यात गुटख्याची सर्रास विक्री
शासनाने गुटखा विक्रीवर बंदी आणलेली असतानाही गेल्या काही दिवसापासून मेहकर शहर, जानेफळ, डोणगाव, सुलतानपूर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्रासपणे गुटखा विक्री सुरू आहे. गुटख्यावर बंदी असताना सुद्धा चोरटी वाहतूक करून जादा दराने गुटख्याच्या पुड्या विकल्या जात आहे. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी संपूर्ण जिल्हा गुटखा मुक्त करण्यात येईल अशी घोषणा केली होती. मात्र, मेहकर तालुक्यात बेकायदेशीर मार्गाने खुलेआमपणे सुरू असलेल्या गुटखाविक्री पाहता संबंधित अधिकार्‍याच्या आशीर्वादाने हे गुटखा विक्री सुरू असल्याचे बोलले जात आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात व मेहकर तालुक्यात सुद्धा लॉक डाऊन सुरू आहे. मात्र, या लॉक डाऊनच्या काळातही गुटखा विक्री कशी होते असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.