सावधान! अर्थकारणाने व्यवस्था आंधळी; ‘रेडझोन’मधून होतेय गुटख्याची वाहतूक

gutkha.jpg
gutkha.jpg

वाशीम : कोरोना विषाणूंचा वाशीम जिल्ह्यातील प्रसार थोपविण्यास प्रशासन यशस्वी ठरले आहे. मात्र, प्रशासनाचे कष्ट आता वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात असून लॉकडाऊनमध्ये असलेल्या शिथिलतेचा फायदा घेऊन रेडझोनमध्ये असलेल्या जिल्ह्यातून वाशीम जिल्ह्यात गुटख्याची वाहतूक होत आहे.

भुसार मालाच्यामध्ये गुटख्याची पोती रचून ही वाहतूक होत असल्याने हा कोरोना संसर्गाचा नवा मार्ग ठरण्याची शक्यता आहे. या व्यवसायामध्ये मोठे अर्थकारण दडले असल्याने संबंधित विभाग घेत असलेली ध्रृतराष्ट्राची भूमिका जिल्ह्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

वर्‍हाडामध्ये वाशीम जिल्हा ‘ग्रीनझोन’मध्ये आहे. जिल्ह्यामध्ये नोंद झालेल्या दोनही कोरानाबाधीत रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील आहेत. पोलिस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने गेल्या महिन्याभरापासून केलेली मेहनत व बजावलेली भूमिका याला कारणीभूत आहे. मात्र, 4 मे पासून जिल्हा अंतर्गत वाहतुकीला मोकळीक मिळाल्याने याचा फायदा घेत गुटखा माफीयांनी आपले बस्तान पुन्हा बसविले आहे.

यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातून वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुक्याच्या सिमेपर्यंत हा गुटखा बिनबोभाटपणे आणला जातो. त्यानंतर वाशीम जिल्ह्यात प्रवेश करणार्‍या शेतमालवाहक ट्रकमध्ये ट्रकचालकाला जास्त दर देऊन मधोमध गुटख्याची पोती ठेवली जातात. त्याची वाहतूक बिनबोभाटपणे केली जाते. हा गुटखा वाशीमला आल्यानंतर शुक्रवारपेठ भागातील एका गोदामात साठविला जातो. त्यानंतर दुचाकीवर हा गुटखा जिल्हाभर वितरित होतो.

असा होऊ शकतो संसर्ग
हा गुटखा अमरावती जिल्ह्यातून आणला जातो. त्यामध्ये गुटख्याचे पुडे भरताना जर कोणी संसर्ग झालेला असेल तर हे पुढे हाताळताना त्याचा संसर्ग होऊ शकतो. हे पुडे पानपट्टी चालकाच्या घरपोच जात असल्याने घरपोच संसर्गाचा धोका उद्भवू शकतो.

अनसिंगही ठरते मुख्य केंद्र
अमरावती जिल्हा व्यतिरिक्त यवतमाळ जिल्ह्यातूनही गुटखा आणला जातो. ब्राम्हणगाव येथून उडदी, काळापाणी मार्गे अनसिंग येथे हा गुटखा येतो. तो वाशीमपर्यंत आणला जातो. तसेच आसेगाव मार्गे मंगरूळपीर येथे पोचविला जातो.

तक्रारीवरूनही तत्काळ कारवाई
वाशीम जिल्ह्यामध्ये रेडझोन असलेल्या जिल्ह्यातून गुटख्याची वाहतूक होत असेल तर नागरिकांनी याबाबत अन्न व औषधी प्रशासन विभागाला कळवावे, निनावी तक्रारीवरूनही तत्काळ कारवाई केली जाईल. वाशीममध्येही याबाबत चौकशी केली जाणार आहे.
सागर तेरकर, अन्न व औषधी प्रशासन अधिकारी, वाशीम

मलिद्याचा दर वाढला
गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन असले तरीही गुटखा मात्र सर्रास विकला जातो. त्याचे दर मात्र चौपट झाले आहेत. पोलिस प्रशासनाला यावर कारवाई करण्याचे अधिकार नसल्याचे सांगितले जात नसले तरी स्थानिक पातळीवर पोलिसांचे गुटखा माफीयासोबत असलेले लागेबांधे सर्वश्रुत आहेत. गुटखा माफीयांच्या भ्रमणध्वनीचा ‘सिडीआर, एसडीआर’ काढला तर ही बाब उघड होऊ शकते. कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. पवन बनसोड या अधिकार्‍यांनी गुटखा माफीयांच्या विरोधात उघडलेली मोहिम का अपयशी ठरते, याचे उत्तरही या ‘सिडीआर, एसडीआर’ मधून मिळू शकते.

हा घ्या पुरावा...
जिल्ह्यामध्ये गुटखा तस्करी होत नसल्याचे अन्न व औषधी प्रशासन दावा करीत होते. मात्र, आज (ता. 9) स्थानिक गुन्हे शाखेने रिसोड तालुक्यातील भोकरखेडा येथील दत्ता कौतिका रंजवे याच्या घरातून 4 लाख 35 हजार रूपयांचा गुटखा जप्त केला आहे. ‘सकाळ’ ने वाशीममधील गुटखा माफियाचे केंद्र रिसोड तालुक्यात या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. हा गुटखा वाशीमवरूनच भोकरखेडा येथे साठविण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com