esakal | गुंगी आल्याने लागली चिमुकल्याला झोप, अन् गुरुजींनी लावले शाळेला कुलूप 

बोलून बातमी शोधा

Tushar Raut

आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्थानिक जि.प. कन्या शाळेतसुद्धा विद्यार्थ्यांना या गोळ्यांचे वाटप केले. तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या तुषार महेश राऊत या विद्यार्थ्यानेसुद्धा या गोळ्या खाल्ल्या. मात्र, तो उपाशीपोटी असल्याने त्याला गोळ्यांची गुंगी आली.

गुंगी आल्याने लागली चिमुकल्याला झोप, अन् गुरुजींनी लावले शाळेला कुलूप 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देवरी (जि. गोंदिया) : आरोग्य कर्मचाऱ्यांनी शाळेत वाटलेल्या हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्या खाल्ल्याने एका विद्यार्थ्याला गुंगी येऊन वर्गातच झोप लागली. मात्र, शाळा सुटल्यानंतर वर्गखोल्यांची पाहणी न करताच गुरुजी शाळेला कुलूप लावून घरी निघून गेले. हा संतापजनक प्रकार देवरी येथे बुधवारी (ता.4) घडला. 

जिल्ह्यात गावोगावी हत्तीरोग निर्मूलनासाठी गोळ्यांचे वाटप करणे सुरू आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्थानिक जि.प. कन्या शाळेतसुद्धा विद्यार्थ्यांना या गोळ्यांचे वाटप केले. तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या तुषार महेश राऊत या विद्यार्थ्यानेसुद्धा या गोळ्या खाल्ल्या. मात्र, तो उपाशीपोटी असल्याने त्याला गोळ्यांची गुंगी आली. त्यामुळे त्याने वर्गशिक्षकाला घरी जाण्याची सुटी मागितली. यावर त्या शिक्षकाने तुषारला रागावून घरी जाण्यास मनाई केली. त्यामुळे तुषार घाबरून शाळेतच झोपी गेला. 


अवश्य वाचा- वडील शाळेत जाऊन मुलीला म्हणाले चल आईला घेऊन येऊ, अन् केले हे...

तुषारला जाग आली तेव्हा...

शाळा सुटल्यावर सर्व शिक्षकांनी नेहमीप्रमाणे वर्गखोल्यांची तपासणी न करता शाळेला कुलूप लावून आपापले घर गाठले. झोप लागल्यामुळे तुषार वर्गातच कोंडला गेला होता. जेव्हा तुषारला जाग आली, तेव्हा रात्र होऊन वर्गात अंधार पडला होता. त्यामुळे घाबरून तुषार रडायला लागला. त्याच्या रडण्याचा आवाज रस्त्याने जाणाऱ्या सुनील चोपकर यांना ऐकायला आला. त्यांनी खिडकीतून बघितले तेव्हा तुषार वर्गात एकटाच असल्याचे दिसले. चोपकर यांनी मुख्याध्यापकाला फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर शाळेचे कुलूप उघडून तुषारला सुखरूप बाहेर काढले.