file photo
file photo

आरोग्याचा "ताप' आणि संतापही! 

नागपूर ः लोकांचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून सार्वजनिक आरोग्य विभाग अस्तित्वात आला. मात्र, हाच आरोग्य विभाग लोकांच्या आरोग्यासाठी ताप आणि संतापही बनला आहे. जिल्हा रुग्णालयापासून तर ग्रामीण रुग्णालयात सुविधांची वानवा आहे. सुविधा नसल्याने डॉक्‍टर येत नाहीत आणि डॉक्‍टर नसल्यामुळे आरोग्य केंद्राच्या इमारती फक्‍त शोभच्या वास्तू म्हणून उभ्या आहेत. आतापर्यंतच्या सरकारने आरोग्य विभागाला पुरेसा निधी न दिल्याने आरोग्य विभाग सलाइनवर आहे. याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील नागरिकांना संताप होत आहे. सरकारच्या लकवा धोरणामुळे आरोग्यसेवा खिळखिळी झाली आहे. रुग्णालयात अधिकारी, इतर वैद्यकीय पदे रिक्‍त असल्याने काय करावे, असा प्रश्‍नही नागरिकांनाच नव्हे, तर अधिकाऱ्यांना पडला आहे. 

आ​रोग्यसेवेला सध्या घरघर

अमरावती जिल्ह्यातील आरोग्यसेवेला सध्या घरघर लागली आहे. 25 लाखांवर लोकसंख्या असलेला जिल्हा आता आरोग्य सेवेच्या मानांकनामध्ये माघारलेला आहे. मेळघाटातील कुपोषणामुळे आधी कुप्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात आरोग्याच्या पुरेशा सोयी नाहीत. जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेली रिक्त पदे मागील 10 वर्षांपासून भरलेली नाहीत. परिणामी एका परिचारिकेला 70 रुग्णांकडे लक्ष द्यावे लागत आहे. अत्याधुनिक उपकरणांची मारामार आहे. याशिवाय सुपर स्पेशालिटी टप्पा 2 अद्याप सुरू झालेला नाही. गंभीर आजारावर या ठिकाणी उपचार होत नाहीत. या ठिकाणी 250 छोट्यामोठ्या यंत्रांची आवश्‍यकता आहे. पैकी आतापर्यंत केवळ 12 यंत्रेच रुग्णालयाला प्राप्त झाली आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव मंत्रालयात धूळखात पडला आहे. कृती समितीमार्फत यावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मेळघाटातील आरोग्य सुविधा पूर्णपणे कोलमडली आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयातही मनुष्यबळाची कमतरता आहे. एका खाटेवर दोन गर्भवती महिलांना उपचार घ्यावा लागतो. विशेष म्हणजे, स्वच्छतेचा मुद्दा सार्वजनिक रुग्णालयात हा चिंतेचा विषय आहे. सरकारने आतापर्यंत लक्ष न दिल्याने जिल्हाच आता रुग्णशय्येवर आहे. ग्रामीण भागातील उपकेंद्र डॉक्‍टर नसल्याने बंद होण्याच्या मार्गावर आहे. या रुग्णालयाच्या परिसरामध्ये जनावरे चारा शोधत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रही गुरांचे कोंडवाडे झाली की काय, असे वाटत आहे. आरोग्य केंद्रांमध्ये सुविधा नाहीत. परिचारिका नाहीत. एका खाटेवर दोन रुग्णांना उपचार घ्यावा लागत आहे. मनुष्यबळ कमी असल्याने जे डॉक्‍टर आहेत त्यांच्यावर कामाचा भार वाढला आहे. याचा परिणाम हे टिकणार किंवा नाही, असा प्रश्‍न आहे. 

महिला रुग्णालयाची मागणी

भंडारा जिल्ह्यात एक सामान्य रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालये व सात ग्रामीण रुग्णालये आहेत. येथे महिला रुग्णालयाची मागणी गेल्या 10 वर्षांपासून सुरू आहे. आधी त्यासाठी जागा मिळत नव्हती. आता जागा मिळाली असून शासनाकडून 61 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. रुग्णालयाचे भूमिपूजन झाले आहे. परंतु, अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या बरीच मोठी आहे. त्यामुळे खाटा अपुऱ्या पडत असल्याने रुग्णांना जमिनीवरच ठेवले जाते, शिवाय येथील डॉक्‍टर, कर्मचारी व तज्ज्ञांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील महिला रुग्णालयाचे काम त्वरित पूर्ण होण्याची आवश्‍यकता आहे. तालुका स्तरावरील उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांचे हात होताना दिसून येत आहे. निधीअभावी औषधी इतर साहित्य रुग्णांना स्वतः खरेदी करावे लागत आहे. शासकीय रुग्णालय फक्‍त नावालाच आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा याकडे दुर्लक्ष करीत आहेत. 

कुठे रुग्णवाहिका आहे, तर वाहनचालक नाही

वर्धा जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालये, दोन मोठी खासगी रुग्णालये आहेत. जिल्ह्यात पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, तालुका रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांची अवस्था फारशी चांगली नाही. वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता, सोयीसुविधांचा अभाव आहे. रुग्णवाहिकांची संख्या अपुरी आहे. कुठे रुग्णवाहिका आहे, तर वाहनचालक नाही, तर कुठे वाहनचालक आहे, तर रुग्णवाहिका नाही, नादुरुस्त आहे, अशी स्थिती आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता दूर करण्याकरिता अलीकडे 40 जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आरोग्यसेविकांच्या नवीन मंजूर 125 जागा भरायच्या आहेत. सध्या याकरिता जिल्हा परिषदेकडून प्रक्रिया सुरू आहे. या जागा भरल्यानंतर रिक्त पदांबाबतची समस्या सुटणार आहे. दरवर्षी जिल्हा नियोजन समितीकडे दुरुस्ती, बांधकाम, सोयीसुविधांकडे मागणीचा प्रस्ताव केला जातो. गेल्या वर्षी 20 कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार निधी मिळून प्रस्तावित कामे पूर्ण करण्यात आली, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले यांनी दिली. 

सोनोग्राफीसाठी तारीख पे तारीख

यवतमाळ जिल्ह्यात आरोग्याचा प्रश्‍न गंभीर आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुविधा असल्यातरी बहुतांश वेळा अत्याधुनिक उपकरणे बंद असतात. परिणामी रुग्णांना खासगीचा आधार घ्यावा लागतो. एक्‍सरेसाठी रुग्णांना रांगेत तासन्‌तास उभे राहावे लागते. तर, सोनोग्राफीसाठी तारीख पे तारीख दिली जाते. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम सुरू असले तरी त्याला आणखी किती वेळ लागेल हे निश्‍चित नाही. तज्ज्ञ डॉक्‍टर उपलब्ध होईल की नाही, हे एक कोडेच आहे. ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी तर काही ठिकाणी औषधांचा तुटवडा आहे. खनिज विकास निधीतून औषधीकरिता निधी दिला असला तरी नियोजनाअभावी तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहे. गावातील लोकसंख्येनुसार डॉक्‍टरांची संख्या कमी आहे. तसेच आरोग्य केंद्रातील अनेक पदे रिक्त आहे. 

आरोग्य सुविधांचा बोजवारा

गडचिरोली जिल्ह्यात एक जिल्हा सामान्य रुग्णालय, 13 ग्रामीण रुग्णालये, 45 प्राथमिक आरोग्य केंद्रे, तर 36 आरोग्य पथके आहेत. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत ही व्यवस्था अतिशय तोकडी आहे. विशेषत: ग्रामीण भागांत आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला आहे. तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रयत्नांनी गडचिरोली शहरात महिला व बाल रुग्णालय प्रारंभ झाले. पण, या रुग्णालयातसुद्धा सुविधांचा अभाव आहे. येथील रुग्णांना अनेक इतरत्र पाठविण्यात येते. जिल्हा सामान्य रुग्णालयात खाटांची संख्या कमी असल्याने रुग्णांना खाली झोपावे लागते. येथे दोन लिफ्ट आहेत. मात्र, काही महिन्यांपासून बंद आहेत. परिसरात अस्वच्छता, गुरांचा वावर आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्‍टर, नर्स व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. अनेकदा संतप्त नागरिकांकडून अशा आरोग्य केंद्रांना कुलूप लावण्यासाठी आंदोलने झाली आहेत. 

आरोग्य व्यवस्था मृत्युशय्येवर

गोंदिया जिल्ह्यात रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील अने पदे रिक्‍त असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. काही रुग्णालये सुरूच राहत नसल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातून येत आहे. जिल्हा रुग्णालयातील अवस्था फारशी चांगली नाही. येथे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती फक्‍त नावालाच उरल्या आहेत. तर प्राथमिक आरोग्य केंद्रेही दुर्लक्षित आहेत. जिल्हा प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्याचा आरोप आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था मृत्युशय्येवर असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेली आरोग्य योजनाही सध्या आचके देत आहेत. उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्रांतील अनेक पदे रिक्‍त आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्यातील प्रदूषण वाढत असल्याने आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी सरकारकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. याचा परिणाम ग्रामीण रुग्णसेवेवर झाला आहे. 

सरकारने आरोग्य सेवेकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. त्यांच्या दुर्लक्षामुळे लोकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. रिक्‍त पदे भरण्यात यावी, तसेच औषधी आणि इतर सुविधाही तत्काळ पुरविण्यात याव्यात. 
- विजय शेंडे, आरोग्यविषयक सामाजिक कार्यकर्ते. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com