आज ३ वाजता होणार महत्वपूर्ण निर्णय; नऊ आरोग्य कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी घेणार डॉक्टरांच्या राजीनाम्याबाबत बैठक

 Health workers union officials will take meeting on resigns of doctors
Health workers union officials will take meeting on resigns of doctors

यवतमाळ : जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी काल वैद्यकीय अधिकाऱ्यांना उद्धट वागणूक दिल्यानंतर जिल्हा आरोग्य सेवेतील ८९ डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामे दिले. या डॉक्टरांना जवळपास सर्व आरोग्य कर्मचारी संघटनांची साथ असल्याचे सध्यातरी दिसत आहे. पण जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात नेमकी काय भूमिका घ्यायची, याबाबत नऊ आरोग्य कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आज दुपारी ३ वाजता बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत. 

जिल्हा प्रशासनाच्या दडपशाहीला घाबरत नाही. पण आठ महिन्यांपासून जी अविरत सेवा दिली, त्याला कुठेही गालबोट लागू न देता आंदोलनाची दिशा बैठकित ठरवू, असे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे यांनी सांगितले. 

कोरोनाचे संकट गडद होत असताना डॉक्टरांनी काम बंद केल्यामुळे जिल्ह्यावर मोठे संकट घोंघावू लागले आहे. आम्हीही माणसं आहोत, आम्हालाही कुटुंब आहे, कौंटोंबिक जबाबदाऱ्या आहेत, ही बाब जिल्हाधिकारी समजूनच घेत नाहीये. आरोग्य विभागातील प्रत्येक जण फेब्रुवारी महिन्यापासून शासनाच्या दिशानिर्देशांनुसार, घड्याळाचे काटे न पाहता अविरत राबतो आहे. योद्धा म्हणून काम करतो आहे. 

येवढ्या मोठ्या लढ्यात सक्रिय असताना वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या छोट्या-मोठ्या मागण्या समजून घ्यायला पाहिजे, ही अपेक्षा आहे. पण जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टरांचे ऐकून न घेता उद्धट वागणूक देऊन त्यांचा अपमान केला. त्यामुळे सर्व जण संतप्त झाले आहेत, असे जयसिंगपुरे यांनी सांगितले. 

महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना, महाराष्ट्र जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना, भारतीय नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी युनियन यांसह एकूण नऊ संघटनांचे पदाधिकारी आज दुपारी ३ वाजता काल झालेल्या प्रकारावर चर्चा करणार आहेत आणि डॉक्टरांना सक्रिय पाठिंबा द्यायचा की नेमके काय करायचे, याबाबत निर्णय घेणार असल्याचेही श्री जयसिंगपुरे यांनी सांगितले. 

आधी काम करू की रिपोर्ट  तयार करू 

रात्री उशिरा घरी आलेला आरोग्य कर्मचारी सकाळ ९ वाजता पुन्हा आपले काम सुरू करतो आणि १२ वाजता त्याला रिपोर्टिंग मागितले जाते. अशा वेळी त्याला प्रश्‍न पडतो की काम करू की आधी रिपोर्ट तयार करू. आरोग्य सेवा करायची आहे, तर मग कागदी घोडे नाचवण्याची खरच गरज आहे का, असा प्रश्‍नही जयसिंगपुरे यांनी उपस्थित केला. प्रत्यक्ष सेवा करण्यापेक्षा रिपोर्ट तयार करण्याला जास्त महत्व दिले जात आहे. रिपोर्ट सर्व काम संपल्यावर सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी दिला तरीही काही फरक पडत नाही, असेही ते म्हणाले.      

संपादन - अथर्व महांकाळ   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com