
अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणात प्रत्यक्ष सुनावणीचा आज दुसरा दिवस होता. सकाळी ११ वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. माजगावकर यांच्या समक्ष सुनावणीला सुरुवात झाली.
हिंगणघाट (जि. वर्धा) : अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणात मंगळवारी (ता. १२) महत्त्वाच्या प्रत्यक्षदर्शी १९ वर्षीय साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली. साक्ष व आरोपी पक्षातर्फे उलटतपास तब्बल चार तास चालला. तसेच मंगळवारी मृत अंकिताच्या वडिलांचीही साक्ष नोंदविण्यात आली. यादरम्यान ते अत्यंत भावनिक झाले होते. या प्रकरणात उद्या आणखी चार साक्षीदार नोंदविले जाणार आहे.
हेही वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं
अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणात प्रत्यक्ष सुनावणीचा आज दुसरा दिवस होता. सकाळी ११ वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. माजगावकर यांच्या समक्ष सुनावणीला सुरुवात झाली. कामकाजाच्या सुरुवातीलाच या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अभय तळवेकर याची साक्ष झाली. न्यायालयात त्याने आपण आरोपी विकेशला अंकिताच्या अंगावर पेट्रोल टाकताना व तो पळून जाताना त्याचा चेहरा बघितल्याचे न्यायालयाला सांगितले. तसेच त्याने न्यायालयात पीडितेची हँडबॅग तसेच आरोपीने अंकिताच्या अंगावर पेट्रोल टाकताना वापरलेली कापलेली प्लास्टिकची बॉटल ओळखली. याआधी त्याने न्यायालयीन कोठडीतही आरोपीला ओळखले होते. यावेळी सरकारी पक्षातर्फे प्रसिद्ध विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी काम पाहिले. त्यांना सरकारी वकील अॅड. सोईतकर यांनी सहकार्य केले.
हेही वाचा - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली
अभियोग पक्षाच्या वतीने शव परीक्षण पंचनाम्याच्या पंच साक्षीदार नागपूरच्या देशमुख, मातोश्री कॉलेजचे प्राचार्य डॉ.उमेश तुळसकर आणि घटनास्थळावरील पंच सचिन बुटले या तीन जणांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या होत्या. उद्या सरकारी पक्षातर्फे आणखी चार जणांची साक्ष नोंदविली जाणार आहेत. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण ७७ साक्षीदार आहेत. त्यातील आवश्यक साक्ष सरकारी पक्षातर्फे नोंदविली जाणार असल्याचे सरकारी वकील ऍड. प्रसाद सोईतकर यांनी सांगितले.
हेही वाचा - लग्नानंतरच दीड वर्षात झाले पतीचे निधन, तरीही खिचडी शिजविली तिथेच गाठले नगराध्यक्षपद
वडील गहिवरले -
प्रत्यक्षदर्शीच्या साक्षीनंतर सरकारी पक्षातर्फे पीडित मृत अंकिताचे वडील अरुण नागोराव पिसुड्डे यांची साक्ष झाली. या दरम्यान ते अत्यंत गहिवरले होते. आरोपीचे वकील भूपेंद्र सोने यांनी त्यांची उलटतपासणी घेण्यासाठी अर्ज करून वेळ मागितला. न्यायालयाने तो मान्य केल्याने पुढे कामकाज चालले नाही. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अभय तळवेकर याची आरोपीचे वकील भूपेंद्र सोने यांनी उलट तपासणी घेतली. सकाळी ११ वाजता त्याची साक्ष सुरू झाली. दुपारी अर्धा तासाच्या विश्रांती नंतर सव्वा ३ वाजेपर्यंत त्याची साक्ष चालली.