हिंगणघाट सुरळीत मात्र अंकिताच्या घरी भयाण शांतता 

प्रभाकर कोळसे
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

सोमवारी दिवसभर असणारी गावातील वर्दळ मंगळवारी मात्र थांबली होती. काल अंकिताच्या घरी असणारी वर्दळ आज दिसत नव्हती. घरी उरले ते केवळ अंकिताचे आप्तेष्ट एवढाच.

नंदोरी (जि. वर्धा) : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्‍यातील दारोडा गावची लेक अंकिता पिसुड्डे हिच्या मृत्यूची बातमी समजताच गाव सुन्न झाले होते. गावावर शोककळा पसरली अन्‌ लोकांचा संताप अनावर झाला. अंकिताच्या घरासमोर गावासह परिसरातील गावांतील नागरिकांची गर्दी उसळली होती. दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी (ता. 11) गावासह हिंगणघाटातील नागरिक पुन्हा दैनंदिन कामाला लागले. मात्र, अंकिताच्या घरी भयाण शांतता पसरली आहे.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे विकेश नगराळे याने सोमवारी (ता. 3) पेट्रोल टाकून अंकिता पिसुड्डे हिला जाळले. आठ दिवसांनी सोमवारी (ता. 10) सकाळी 6.55 मिनिटांनी नागपुरातील खासगी रुग्णालयात अंकिताचा मृत्यू झाला. 30 ते 40 टक्के जळालेल्या अंकिताची सात दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. मृतदेहावर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास दारोडा गावात शोकमग्न वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्तही चोख होता. 

अधिक वाचा - अंकिताला जिवानिशी ठार करणे हाच होता विकेशचा उद्देश

यापूर्वी गावकरी राज्य महामार्गावर येऊन अंकिताच्या मृतदेहाच्या प्रतीक्षेत होते. संतप्त गावकऱ्यांनी महामार्ग दीड तास रोखून धरला होता. अंकिताचे शव घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेचे आगमन होताच गावकऱ्यांच्या संयमाचा बांध सुटला आणि आक्रमक होत रुग्णवाहिकेवर दगडफेक करण्यापावेतो मजल मारली. अंत्यविधीचे सोपस्कार आटोपले आणि अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर निवासी जिल्हाधिकारी, खासदार, आमदार आणि इतर गणमान्य नागरिकांच्या उपस्थितीत अंकिताला वडिलांनी मुखाग्नी दिली अन्‌ अंकिता पंचतत्वात विलीन झाली. 

सोमवारी दिवसभर असणारी गावातील वर्दळ मंगळवारी मात्र थांबली होती. काल अंकिताच्या घरी असणारी वर्दळ आज दिसत नव्हती. घरी उरले ते केवळ अंकिताचे आप्तेष्ट एवढाच. एक दिलासा की आज सकाळी वडनेर गावचे निवासी तथा विधानसभा परिषद सदस्य आमदार डॉ. रामदास आंबटकर यांनी भेट देऊन घरच्यांचे सांत्वन केले. 

गावकरी दैनदिन कामात व्यस्त

अंकिताचे आप्तेष्ट तिच्या अंत्यविधीनंतरच्या सोपस्कारात तर गावकरी दैनंदिन व्यवहारात मग्न झाल्याचे चित्र दारोडा गावात मंगळवारी दुपारी पाहायला मिळाले. काल अंकिताच्या घराचा परिसर महिला-माणसांच्या गर्दीने फुलला होती. घरसुद्धा आप्तेष्टांनी भरले होते. आज मात्र अंकिताचे घर ओस पडले होते.

असे का घडले? - कोणी सांगेल का? माझी काय चूक होती...

न्यायासाठी लढा कायम ठेवण्याची गरज

अंकिताच्या मृत्यूनंतर आंदोलन झाले. रोष व संताप व्यक्‍त करण्यात आला. न्याय मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिकाही गावकऱ्यांनी घेतली होती. आश्‍वासनानंतर अंत्यसंस्काराची तयारी झाली. अंत्यसंस्कार आटोपताच गावकरी निघून गेले. अंकिता पंचतत्वात विलीन झाली असली तरी तिला न्याय अद्याप मिळालेला नाही. यासाठी लढा देण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hinganghat started normal working after funeral of ankita