अरे वा! आता मिळणार शेतकऱ्यांना घरपोच बियाणे व खते; करावी लागणार ऑनलाइन नोंदणी

biyane v khate.jpg
biyane v khate.jpg

नांदुरा (जि. बुलडाणा) : खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाण्यांची खरेदीसंदर्भात गैरसोय होऊ नये तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांची कृषी केंद्रांवर गर्दी होऊ नये म्हणून शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून मागणी नोंदविल्यास शेतकऱ्यांना घरपोच बियाने व खते देण्याचा उपक्रम कृषी विभागाने हाती घेतला आहे. सद्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अधिक दक्षता बाळगावी असे आवाहनही कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

खरीपची लगबग सुरू
खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून शेतकरी सद्या शेतीमशागतीला महत्त्व देत शेतीकामात मग्न आहेत. येत्या महिनाभरात खरीप हंगामाची पेरणी करण्याचे संकेत प्राप्त होत असल्याने खते, बियाण्यांची जुळवाजुळव करण्यासाठी घरात असलेला माल विकण्याची लगबग सुरू असून, व्यापारी कोरोनाच्या लॉगडाउनचा फायदा उचलत मातीमोल भावात शेतकऱ्यांचा माल खरेदी करीत आहेत. सीसीआय कापूस खरेदी, नाफेडची व इतर पिकांची खरेदी सुरू करण्यात आली असताना एकच गर्दी नोंदणीसाठी झाली असल्याने, हे पैसे लवकर मिळत नसल्याने खासगी व्यापाऱ्यांना शेतमाल विक्री केल्या जात आहे. खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणत्या दक्षता घ्याव्यात याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सोयाबीन हे सरळ वाण असल्यामुळे दरवर्षी नवीन सोयाबीनचे वाण वापरण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करून त्याची उगवण क्षमता 70 टक्केपर्यंत तपासून एकरी 35 किलो बियाणे वापरण्याचे संकेत शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. तसे गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन व उगवण क्षमता काढण्याचे तंत्र शेतकऱ्यांना दिले जात आहेत.

ऑनलाइन नोंदणीनंतर घरपोच सेवा
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना घरपोच बियाणे व खते देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन मागणी संकेतस्थळावर नोंदविल्यास त्यांना रास्त भावात पसंतीच्या कृषी केंद्रातून बियाणे व खते पुरविल्या जातील. त्याकरिता कृषी सहाय्यक, कृषी मित्र व प्रगतिशील शेतकरी मदत करणार आहेत.

उगवणशक्ती तपासण्यासाठी मोहीम
सोयाबीन तसेच इतर तत्सम बियाण्यांची उगवणशक्ती तपासण्यासाठी कृषी विभागाने मोहीम हाती घेतली आहे. कृषी सहाय्यक व मंडळ अधिकारी गावागावात जाऊन सामाजिक अंतर बाळगत शेतकऱ्यांना याबाबत प्रशिक्षण देत आहेत.

कृषी केंद्रात होणारी गर्दी टाळावी
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना थेट घरापर्यंत रास्त दरामध्ये बियाणे व खते देण्याचा उपक्रम शासनाने कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर हाती घेतला असून, ऑनलाइन मागणी करून शेतकऱ्यांनी कृषी केंद्रात होणारी गर्दी टाळावी. यासाठी काही मदत लागल्यास कृषी सहाय्यक व कृषिमित्रांशी संपर्क साधावा.
-पी. इ. अंगाइत, तालुका कृषी अधिकारी, नांदुरा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com