
अचलपूर (जि. अमरावती) : नादुरुस्त रस्ते आणि अपघात हे समीकरणच आहे. या अपघातांमध्ये काहींचा जीव गेल्याशिवाय प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागे होत नाही. आता तर मेळघाटात रस्त्यांबरोबरच पूलही वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहेत, मात्र हे पूल दुरुस्त करण्याकडे प्रशासनाचा कानाडोळा सुरू आहे.
मेळघाटातून जाणाऱ्या परतवाडा-धारणी, खंडवा, इंदूर या आंतरराज्य मार्गावरील घाटवळणातील ब्रिटीशकालीन पुलांना उतरती कळा लागली असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश पूल खचू लागल्याने मेळघाटात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
मेळघाटातून जाणाऱ्या या आंतरराज्य मार्ग क्रमांक 14 वर इंग्रजांच्या राजवटीत बांधलेले लहान-मोठे जवळपास 55 पूल आहेत. त्या पुलांची सद्यस्थिती बिकट झाल्याचे दिसून येत आहे, तर काही पुलांचे दगड कोसळत चालले आहेत. परतवाडा शहरातून व्हाया मेळघाट, सेमाडोह, हरिसाल,धारणी, खंडवा, इंदूर याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक प्रवास करतात. या मार्गाने नदीनाले असल्याने त्यावर इंग्रजकाळात पूल बांधले होते. मात्र आता या पुलांना उतरती कळा लागल्याने त्यांची दुरुस्ती तथा या सर्व इंग्रजकालीन पुलांचे ऑडिट करण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलांचे ऑडिट करून पुलांना कठडे बसविणे गरजेचे झाले आहे, अन्यथा एखाद्या वेळी मोठ्या अपघाताला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मेळघाटचे जंगल हिरवेगार झाले आहे, त्यात पुलांच्या आजूबाजूला गवत वाढले आहे. परिणामी गवतामुळे पुलाच्या जवळ जाईपर्यंत वाहकांना पूल असल्याचे निदर्शनास येत नाही. परिणामी अशा वेळी अपघात घडण्याची दाट शक्यता असते.
अनेकांचा अपघात
मेळघाटातील ब्रिटीशकालीन पुलांना कठडे नसल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. या पुलावर आजपर्यंत अनेकदा अपघात घडले आहेत. मागील वर्षीसुद्धा एका शिक्षकाला पुलावरून कोसळल्याने जीव गमवावा लागला होता, तरीसुद्धा प्रशासन याकडे गंभीरपणे बघत नाही.
कोरोनामुळे विलंब
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेळघाटातील काही पुलांना कठडे व दुरुस्ती करण्याच्या कामास विलंब होत आहे, तर काही कामे मंजूर झाली आहेत. मात्र वनविभागाच्या परवानगीला विलंब होत असल्याने सदर कामे करण्यास उशीर होत आहे. लवकरच दुरुस्ती व कठडे बसविण्याचे काम सुरू करणार आहे. तसेच धोकादायक पुलांचे ऑडिट काही महिन्यांपूर्वीच करण्यात आले आहे.
चंद्रकांत मेहत्रे
मुख्य उपकार्यकारी अभियंता बांधकाम विभाग अचलपूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.