Video : पीडितेची प्रकृती नाजूक; आरोपीला मध्यरात्रीच केले न्यायालयात हजर

Increase in accused's court closet in Hinganghat case
Increase in accused's court closet in Hinganghat case

हिंगणघाट (जि. वर्धा) : प्राध्यापक युवतीला पेट्रोल टाकून जाळणारा आरोपी विकेश नगराळे (वय 27, रा. दारोडा) याची पोलिस कोठडी शनिवारी (ता. आठ) संपल्याने मध्यरात्रीच न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्याला पोलिस कोठडी अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडी सुनावाली आहे. यामुळे त्याची रवानगी कारगृहात करण्यात आली आहे. दुसरीकडे पीडितेची प्रकृती नाजूक असल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली आहे.

आरोपीला शनिवारी (ता. 8) न्यायालयात आणणार असल्याची माहिती नागरिकांना असल्याने त्यांची गर्दी होऊन उद्रेक होण्याची शक्‍यता असल्याने शुक्रवारी (ता. 7) रात्रीच न्यायालयात हजर केल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीची पोलिस कोठडी अबाधित ठेवल्याने त्याला तपासासाठी केव्हाही पोलिस ताब्यात घेऊ शकतात. विकेश नागराले याला हिंगणघाट येथील प्रथमश्रेणी न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता न्यायाधीश आर. व्ही. डफरे यांनी पोलिसांचे म्हणणे ऐकत हा निकाल दिला.

जाणून घ्या - बोंबला, भागवतासाठी आला अन् बायको घेऊन पळाला

पोलिसांनी आमचा तपास पूर्ण झाला असे म्हणत त्याला न्यायालयीन कोठडी दिल्यास हरकत नाही, असे न्यायालयाल सांगितल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकड़ून देण्यात आली आहे. विकेश याने सोमवारी (ता. तीन) सकाळी एका प्राध्यापक युवतीला पेट्रोल टाकून जाळले होते. घटनेच्या काही तासातच त्याला पोलिसांनी अटक केली होती. प्रारंभी त्याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या काळात पोलिसांनी त्यांचा तपास पूर्ण केल्याचे सांगण्यात येते. येत्या आठवड्यात या प्रकरणाचे दोषारोपपत्र सादर करण्यात येईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.


न्यायालय परिसरात नागरिकांची गर्दी

आरोपी विकेश नगराळेला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याने परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र, पोलिसांनी रात्रीच त्याला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी मिळवून घेतली. पोलिसांनी केलेल्या अपेक्षेप्रमाणेच नागरिकांची गर्दी न्यायालय परिसरात झाली होती.


भल्यापहाटे नेले होते घटनास्थळी

आरोपीला घटनास्थळी नेत पंचनामा करणे कायद्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आरोपीला भरदिवसा नेल्यास जनआक्रोश पाहता मोठा अनर्थ होण्याची शक्‍यता होती. त्यामुळे पोलिसांनी या परिसरातील नागरिक साखरझोपेत असताना त्याला घटनास्थळी नेत पंचनामा केल्याचे पुढे आले.
 

इंफेक्‍शन जास्त वाढले नाही
पीडितेची प्रकृती किंचित खालावली असून, कृत्रिम श्‍वासोश्‍वास लावले आहे. हे चांगले संकेत नाही. मात्र, इंफेक्‍शन जास्त वाढलेले नाही.
- डॉ राजेश अटल

पीडितेची प्रकृती नाजूक

पीडितेची प्रकृती नाजूक असल्याने आज ड्रेसिंग करण्यात येणार नाही. स्टेबिलाईज करणे आवश्‍यक आहे. शुक्रवारी पोषण नलीका टाकल्याने जेवण देण्यास सुरुवात केली आहे. पीडित पूर्णपणे शुद्धीवर असून, डोळे उघडले आहेत. दृष्टी पूर्णपणे असल्याची माहिती डॉ. दर्शन रेवनवार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com