esakal | Lockdown : जीवनावश्यक वस्तूंची वाढीव दरात विक्री, कारवाई शून्य; मात्र यांना बसतोय आर्थिक फटका
sakal

बोलून बातमी शोधा

essential commodities

सध्या कोरोना व्हायरसमुळे ताळेबंदी असून, सर्वत्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यापासून सर्व लहान मोठे व्यवसाय बंद आहे.

Lockdown : जीवनावश्यक वस्तूंची वाढीव दरात विक्री, कारवाई शून्य; मात्र यांना बसतोय आर्थिक फटका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मेहकर (जि.बुलडाणा) : सध्या कोरोना व्हायरसमुळे ताळेबंदी सुरू आहे. या काळात मेहकर शहरामध्ये जीवनावश्यक वस्तूंची जादा दराने सर्रासपणे विक्री सुरू आहे. त्यामुळे गोरगरिबांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून स्थानिक पातळीवर कारवाईच्या नावाने बोंबाबोंब आहे.

सध्या कोरोना व्हायरसमुळे ताळेबंदी असून, सर्वत्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यापासून सर्व लहान मोठे व्यवसाय बंद आहे. गोरगरीब, मजुरांना रोजगार मिळत नाही. कित्येक गोरगरीब कुटुंबावर उपासमारीची पाळी येत आहे. गोरगरिबांसाठी शासनाकडून रास्त भावात अथवा मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, या ताळेबंदीच्या काळात मेहकर शहरातील काही दुकानांमधून जीवनावश्यक वस्तूंची सर्रासपणे जादा दराने विक्री सुरू आहे. 

आवश्यक वाचा - कोरोनाने मारले अन् या व्यवसायाने तारले, लाॅकडाउनमुळे बेरोजगार झालेल्या शेकडो युवकांना मिळतोय रोजगार

या काळात कोणत्याही दुकानदाराने जीवनावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री करू नये अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडून देण्यात येत आहे. मात्र, स्थानिक पातळीवर या सूचनांचे कोठेही पालन होताना दिसून येत नसून कित्येक किराणा दुकानांमधून सर्रासपणे जीवनावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री सुरू आहे. ताळेबंदीच्या काळात कोणीही नियमांचे उल्लंघन करून जीवनावश्यक वस्तू जादा दराने विकू नये अशा वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत मात्र, या सूचनेचे मेहकर शहरात कोठेही पालन होताना दिसत नाही. 

हेही वाचा - धक्कादायक! आता लक्षणं नसतानाही आढळत आहेत कोरोनाचे रुग्ण

साखर, तेल ,चहा पत्ती व इतर किराणा दुकानातून मिळणार्‍या जीवनावश्यक वस्तू ठरवून दिलेल्या भावापेक्षा 15 ते 20 टक्के जादा दराने विकल्या जात आहे. नाइलाजास्तव गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तू जादा दराने विकत घ्याव्या लागत आहे. जीवनावश्यक वस्तू जादा दराने विकू नये आहे यासाठी मेहकर शहरातून लाऊडस्पीकरद्वारे सूचना देण्यात येत आहेत. मात्र या सूचनेचे कोठेही पालन होताना दिसत नाही. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

दुकानदाराची नगरपालिकेकडे तक्रार करावी
शहरातील दुकानदारांनी जीवनावश्यक वस्तू जादा दराने विकू नये. ठरवून दिलेल्या भावातच जीवनावश्यक वस्तूची विक्री करावी. जर कोणी जीवनावश्यक वस्तू वाढीव दराने विकत असेल तर अशा दुकानदाराची नगरपालिकेकडे तक्रार करावी. त्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन कारवाई करण्यात येईल.
- सचिन गाडे, मुख्याधिकारी, मेहकर.