विमा कंपनीच्या हेकेखोरपणाचा शेतकऱ्यांना फटका; अनेक लाभार्थी मदतीपासून वंचित

Insurance companies are not ready to give money to farmers
Insurance companies are not ready to give money to farmers

यवतमाळ : जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. असे असतानाही विमा कंपन्या आर्थिक मदत देण्यास धजावत नाहीत. या प्रकारामुळे विमा कंपन्यांविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. म्हणून विम्या कंपन्यांचा हेकेखोरपणा थांबवावा, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

जिल्ह्यात यंदा नऊ लाखांहून अधिक हेक्‍टरवर खरीप हंगामाची लागवड झाली. त्यात सर्वाधिक पेरा कापसाचा आहे. त्याखालोखाल सोयाबीनची पेरणी झाली आहे. तब्बल अडीच लाखांहून अधिक हेक्‍टरवरील सोयाबीनचा पेरा झाला आहे. सुरुवातीला बियाणेच बोगस निघाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करण्याची वेळ आली. त्यानंतर शेतकऱ्यांनी अनेक अडचणींना तोंड देत दुबार, तिबार पेरणी केली. बदलते वातावारण लक्षात घेता बहुतांश सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. 

अनियमित पावसाचा फटका व त्यानंतर आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन खराब झाले. परतीच्या पावसाने काढून ठेवलेले सोयाबीनसुद्धा खराब झाले. जागेवरच सोयाबीनला कोंब फुटले, बुरशी आली. त्यामुळे शेतकरी रडकुंडीस आले होते. आता विमा कंपन्यांच्या मदतीकडे शेतकऱ्यांची आस लागली होती. 

त्यानुसार पंचनामे करण्यास सुरुवात झाली होती. परंतु, कंपनी प्रतिनिधींनी बहुतांश गावांतील पंचनामे केवळ नावापुरते केलेत. तर काही गावांत एक किंवा दोन शेतकऱ्यांचे पंचनामे करून मदतीचे आश्वासन दिले होते. आता मदत मिळेल, या आशेत असलेल्या शेतकऱ्यांकडे विमा कंपनीने दुर्लक्ष केले आहे. पंचनामे झालेल्या काही भागांतील शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे. त्यावरून शेतकऱ्यांमध्ये विका कंपनीविरोधात तीव्र रोष आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पांढरकवडा तालुक्‍यातील काही गावांत पंचनामे केले. पंचनामे केलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली. परंतु, उर्वरित शेतकऱ्यांकडे विमा कंपनीने दुर्लक्ष केले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये कंपनी विरोधात प्रचंड नाराजीचा सूर उमटला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य नीमिष मानकर यांच्याकडे व्यथा मांडल्या. त्यानंतर काही गावांतील शेतकऱ्यांनी बुधवारी (ता.18) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मानकर, शहजाद रियाज सिद्दीकी, अनिल राठोड, मोहम्मद सलीम, माला राठोड, गजानन किन्नाके, ओंकार राठोड, एजाज दादामिया सिद्दीकी आदी उपस्थित होते.


संपादन - अथर्व महांकाळ  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com