आहे ना आश्‍चर्य? : अहो, उत्पादनापूर्वीच धावली रस्त्यावर कार 

सुरेश नगराळे 
Tuesday, 2 June 2020

चंद्रपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणीनंतर कार मालकाला नोंदणी बुक देण्यात आले होते. त्यात कारची उत्पादनाची तारीख, नोंदणी केलेली तारीख, चेसीच नंबर ,वाहन नंबर, रंग तसेच कार बाबत माहितीचे संपूर्ण विवरणाची नोंद करण्यात आली. मात्र, तीन वर्षानंतर तारखांचा घोळ समोर आला. या दरम्यानच्या काळात हजारो किलोमिटर ही कार रस्त्यावर धावत होती.

गडचिरोली : वाहनांची चोरी तसेच हेराफेरीसाठी नंबर बदलण्याच्या आजवर अनेक घटना उघडकीस आल्या. मात्र, 
कंपनीतून उत्पादनापूर्वीच कार चक्क रस्त्यावर धावल्याचा अफलातून प्रकार समोर आला आहे. एका ग्राहकाच्या कार नोंदणी बुकाची तपासणी झाल्यानंतर हा घोळ उघडकीस आल्याने कार चालकाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. 

हे वाचा— दोन महिन्यांच्या विरहानंतर पुन्हा सुरू झाला लव्ह बर्डसचा चिवचिवाट 

परिवहन विभागाने मागितला खुलासा 

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथील शरिफ कासम शेख यांनी दोन महिन्यापूर्वी चंद्रपूर येथून एम.एच.34-बीबी-1643 या क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार खरेदी केली. त्यानंतर त्यांनी गडचिरोली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यालयात नाव बदलण्यासाठी अर्ज केला असता त्यांना मोठा धक्का बसला. त्याच्या नोंदणी बुकात कार 17 मे2017 ला उत्पादन झाल्याचे दाखविण्यात आले तर खरेदीची तारीख 17 एप्रिल 2017 असा उल्लेख करण्यात आला. हा घोळ गडचिरोली येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी 28 मे 2020 ला चंद्रपूर येथील उपप्रादेशिक कार्यालयाला पत्र पाठवून नोंदणी बुकात नोंद करण्यात आलेल्या तारखांबाबत माहिती मागीतली आहे. कंपनीने उत्पादनापूर्वीच कार विकली होती की, संगणकात घोळ झाला याचाही खुलासा मागीतला आहे. 

हे वाचा—कोरोनामुळे महागला सावजी ठसका, ही आहेत कारणे...
 

तीन वर्षांनंतर तारखांचा घोळ उजेडात 

चंद्रपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणीनंतर कार मालकाला नोंदणी बुक देण्यात आले होते. त्यात कारची उत्पादनाची तारीख, नोंदणी केलेली तारीख, चेसीच नंबर ,वाहन नंबर, रंग तसेच कार बाबत माहितीचे संपूर्ण विवरणाची नोंद करण्यात आली. मात्र, तीन वर्षानंतर तारखांचा घोळ समोर आला. या दरम्यानच्या काळात हजारो किलोमिटर ही कार रस्त्यावर धावत होती. परंतु वाहतूक पोलिसांच्या हा प्रकार कसा लक्षात आला नाही, असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. सध्या लॉकडाउनमुळे कार कंपन्यांना घरघर लागली आहे. यामुळे विक्री तथा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. या समस्येची दखल घेत सरकारने चौथा लॉकडाउनमध्ये उद्योगांना सवलत दिल्याने विविध प्रकारच्या ऑफर देऊन कंपन्यांनी कार विक्रीस सुरवात केल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागात वाहनचालकांची आता वर्दळ दिसून येते. लॉकडाउनमुळे वाहतूक पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जाते. त्यामुळे चालकांना वाहनांची मूळ कागदपत्र सोबत बाळगावे लागत आहेत. तपासणीदरम्यान कित्येकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचेही आढळून आले.त्यात आता एका कारचा अफलातून घोळ चर्चेचा विषय बनला आहे. 

एम.एच.34,बीबी-1643 या क्रमांकाच्या कारच्या नोंदणी बुकातील नावात बदल करण्याबाबत आमच्याकडे अर्ज आला होता. त्या अनुषंगाने तपासणी केली असता त्यातील तारखांबाबत तफावत आढळून आली आहे. यासंदर्भात आम्ही चंद्रपूर येथील उपप्रादेशिक कार्यालयाला कळविले आहे. 
रविंद्र भुयार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी गडचिरोली 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Isn't that a surprise? : Hey, the car ran on the road before production