आमटे परिवाराने फेटाळले करजगींचे आरोप; कौस्तुभ आमटे महारोगी सेवा समितीच्या विश्‍वस्त मंडळावर

Kaustubh Amte is on Board of Trustees of the Leprosy Services Committee
Kaustubh Amte is on Board of Trustees of the Leprosy Services Committee

चंद्रपूर: महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आनंदवनातील कार्यकर्ते व आमटे परिवारातील सदस्यांवर केलेले आरोप संस्थेचे सचिव डॉ. विकास आमटे, सहसचिव डॉ. प्रकाश आमटे यांनी फेटाळले आहेत. दरम्यान, महारोगी सेवा समितीच्या विश्‍वस्त मंडळात कौस्तुभ आमटे यांना जागा देण्यात आली आहे.

कर्मयोगी बाबा आमटे यांनी आनंदवनाची निर्मिती केली. समाजाने बहिष्कृत करण्यात आलेल्या कुष्ठरुग्णांना बाबांनी आधार दिला. त्यांना आत्मनिर्भर केले. गेल्या काही वर्षांत आनंदवनाचा चेहरामोहरा बदलून गेला. आनंदवनाच्या शेकडो एकरांत आता विविध प्रकल्प सुरू झाले. यातून अंध, अपंग, कुष्ठरोगी आत्मनिर्भर झाले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांत वाद झाले. 

यातूनच महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल गौतम करजगी-आमटे यांनी समाजमाध्यमांवर चित्रफित जारी करून त्यात आनंदवनातील कार्यकर्ते, आमटे परिवारातील सदस्यांवर आरोप केले. त्यानंतर काही वेळातच ती चित्रफित हटविण्यात आली होती.

दरम्यान, आमटे परिवाराने डॉ. शीतल गौतम करजगी-आमटे यांनी केलेले आरोप तथ्यहिन असल्याचे व त्याच्याशी सहमत नसल्याचे समाजमाध्यमांवर टाकलेल्या निवेदनातून स्पष्ट केले आहे. त्यावर डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. भारती आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या स्वाक्षरी आहेत. डॉ. शीतल गौतम करजगी-आमटे यांचे संस्थेच्या कार्यात मोठे योगदान आहे. तथापि, त्या सध्या मानसिक ताण, नैराश्य यांचा सामना करीत आहेत. 

त्यांनी अलीकडेच समाजमाध्यमांवर तशी स्पष्ट कबुली देत महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल, विश्वस्तांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल काही अनुचित वक्तव्ये केली. त्यांनी संस्थेचे विश्वस्त आणि कार्यकर्त्यांबद्दल केलेल्या आधारहिन विधानांमुळे कुणाचेही गैरसमज होऊ नये म्हणून निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

संस्थेचे कार्य मागील सात दशकांच्या परंपरेला अनुसरून यापुढे आम्ही करीत राहू. आमच्या नैतिक भूमिकेशी, ध्येय, उद्दिष्टांशी आजन्म प्रामाणिक राहू. आमच्या प्रत्येक प्रकल्पात नैतिक-कायदेशीर मूल्य आणि पारदर्शकता कायमच जपली जाईल, असे आम्ही आमटे कुटुंब एकदिलाने संस्थेचे सर्व लाभार्थी, कार्यकर्ते, सहयोगी यांना आश्वस्त करतो, असे नमूद करून या निवेदनात संस्थेबाबतच्या कोणत्याही अपप्रचारावर समाजाने विश्वास ठेवू नये, अशी विनंती केली आहे.  

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com