
प्राचीन ग्रंथात दंडकारण्य म्हणून ओळख असलेल्या मध्य भारतातील काही भाग जो महाराष्ट्राच्या पूर्वेकडे वसलेला गडचिरोली जिल्हा म्हणून ओळखला जातो आजही प्राथमिक पायाभूत सोयींपासून वंचित आहे.
भामरागड (जि. गडचिरोली) : जग बदलले पण, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याच्या अतिदुर्गम भागांतील ग्रामस्थांचे जगणे बदलले नाही. आजही त्यांना डोंगर, दऱ्या, नदी,नाले पायी पार करून तालुकास्थळ गाठावे लागते. अशाच काही नागरिकांच्या मदतीला धावून जात त्यांना साडी, ब्लॅंकेट, स्वयंपाकासाठी शिधा देऊन येथील लाहेरी पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
प्राचीन ग्रंथात दंडकारण्य म्हणून ओळख असलेल्या मध्य भारतातील काही भाग जो महाराष्ट्राच्या पूर्वेकडे वसलेला गडचिरोली जिल्हा म्हणून ओळखला जातो आजही प्राथमिक पायाभूत सोयींपासून वंचित आहे. न्यायालयांनी ज्या बाबी जगण्याच्या मूलभूत हक्काअंतर्गत येतात असे सांगितले अगदी त्या हक्कांसाठीदेखील इथल्या लोकांना पायपीट करावी लागते.
त्यातल्या त्यात भामरागड तालुक्यातील लाहेरी परिसर या विदारक सत्याचे व भीषण वास्तवाचे जणू प्रतीकच आहे. नुकतीच लाहेरीपासून 20 किमी आत असलेल्या बिनागुंडा येथील 8 महिन्यांहून अधिक गरोदर असलेली बुधणी डुंड्रा पुंगाटी ही डोंगर, नाले ओलांडत वन्यप्राणी असलेल्या भागातून आरोग्य उपचारासाठी लाहेरी येथे आली. तर, बिनागुंडाहुन पुढे 7 किमी असलेल्या कुव्वाकोडी येथून सोमरी सनू उसेंडी ही महिला आपल्या तान्ह्या बाळासह आली होती.
अधिक वाचा - Good News : सोने ५० हजारांच्या खाली; पाच हजारांनी वधारण्याची शक्यता कायम
तसेच तिथून 2 किमी पुढे असलेल्या पंगासुर येथून नेण्डा पुंगाटी असे काहीजण विविध कामानिमित्त लाहेरीत आले. याबाबत माहिती मिळताच लाहेरी उप पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर यांनी तत्काळ त्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यांना साडी, ब्लॅंकेट व शिधा देत त्यांचा खडतर प्रवास काहीसा सुकर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस हवालदार तुकाराम हिचामी, पोलिस शिपाई प्रेमीला तुलावी, संदीप आत्राम, डेव्हिड चौधरी आदी उपस्थित होते.
संपादन - अथर्व महांकाळ