पाणावलेल्या डोळ्यांनी स्वातंत्र्यदिनी दिले ‘अमर रहे'चे नारे; शहीद दुशांत नंदेश्वर यांना अखेरचा निरोप

मिलिंद उमरे
Saturday, 15 August 2020

नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार करीत केलेल्या हल्ल्यात पोलिस जवान दुशांत नंदेश्वर शहीद झाला होते. तर दुसरा जखमी झाला आहे. जखमी जवानाचे नाव दिनेश भोसले आहे. ही घटना देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी शुक्रवारी (ता. १४) सकाळी ८ ते ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

गडचिरोली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (ता. १४) भामरागड तालुक्यातील कोठी येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले पोलिस जवान दुशांत नंदेश्वर यांची गोकुळनगर येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. शनिवारी (ता. १५) अंत्ययात्रेत शहीद दुशांत नंदेश्वर अमर रहे असे नारे लावत नागरिकांनी वीर जवानाला श्रद्धांजली अर्पण केली.

शहरातील मुख्य मार्गाने निघालेल्या अंत्ययात्रेत तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. शहीद दुशांतच्या कुटुंबातील सदस्य व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तत्पूर्वी, स्थानिक पोलिस कवायत मैदानावर शहीद दुशांत नंदेश्वर यांना शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली.

क्लिक करा - जिल्हाधिकाऱ्यांची बदली : `विरोधक' मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचूनही वडेट्टीवारांनी मिळवला ‘विजय'

यावेळी राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद आदी उपस्थित होते.

किराणा साहित्य आणायला गेले होते

भामरागड उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या कोठी पोलिस मदत केंद्रात किराणा साहित्य आणण्यासाठी दुकानात गेलेल्या दोन जवानांवर नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार करीत केलेल्या हल्ल्यात पोलिस जवान दुशांत नंदेश्वर शहीद झाला होते. तर दुसरा जखमी झाला आहे. जखमी जवानाचे नाव दिनेश भोसले आहे. ही घटना देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी शुक्रवारी (ता. १४) सकाळी ८ ते ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

अधिक वाचा -  ते मुहूर्त काढत जातील; पण सरकार इंचभरही हलणार नाही, कोणी व्यक्त केला हा विश्वास...

नक्षलवाद्यांची एक रॅपिड ऍक्‍शन टीम

दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी दोघांवरही अचानक गोळीबार केला होता. गोळीबारानंतर नक्षलवादी घटनास्थळावरून पळून गेले. हे किराणा दुकान पोलिस मदत केंद्रापासून केवळ दोनशे मीटर अंतरावर असल्याचे कळते. नक्षलवाद्यांची एक रॅपिड ऍक्‍शन टीम आहे. ती गुप्तपणे पोलिसांची व रडारवर असलेल्या राजकीय व अन्य नागरिकांची रेकी करून हल्ले करीत असते. यापूर्वीही अशा काही घटना घडल्या आहेत. अशाच एका टीमने हा हल्ला घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Last message to martyr Sushant Nandeshwar