चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप; आर्वी तालुक्‍यातील घटना

रूपेश खैरी
Thursday, 26 November 2020

गणपत हा पद्‌माच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातून तो पद्‌मासह विनोद व राजेश यांना मारहाण करायचा. यातूनच २२ जानेवारी २०१७ रोजी सकाळी ८ वाजता या दोघांत पुन्हा वाद झाला. यावेळी घरी कुणी नसताना गणपत याने पद्‌माचा खून केला.

वर्धा : चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या करणारा आरोपी पती गणपत गोविंद नेहारे याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल अति. सत्र न्यायाधीश नरेश सातपुते यांनी दिला.

घटनेची माहिती अशी की, गणपत गोविंद नेहारे आणि पद्‍‌मा हे दोघे आर्वी येथील मायबाई वॉर्डात वास्तव्यास होते. दोघांना राजेश, विनोद ही दोन मुले आणि मुलगी मिना असे तीन अपत्य आहेत. यात मिनाचे लग्न झाले आहे. गणपत हा गायी चारण्याचे काम करीत होता. पद्‌मा घरोघरी धुणीभांडी करीत होती.

हेही वाचा - बाबा आमटेंच्या आनंदवनमधील वादाला कुठून झाली सुरुवात, नेमके काय आहे प्रकरण? 

गणपत हा पद्‌माच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातून तो पद्‌मासह विनोद व राजेश यांना मारहाण करायचा. यातूनच २२ जानेवारी २०१७ रोजी सकाळी ८ वाजता या दोघांत पुन्हा वाद झाला. यावेळी घरी कुणी नसताना गणपत याने पद्‌माचा खून केला. या घटनेनंतर गणपत याची राजेंद्रसोबत भेट झाली. त्याला घरी चला म्हटले असता तो निघून गेला.

राजेंद्र घरी गेला असता त्याला हत्या झाल्याचे दिसून आले. त्याने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला. तपासाअंती प्रकरण न्यायालयात आले. सदर प्रकरण न्यायाधीश नरेश सातपुते यांच्या न्यायालयात आले.

जाणून घ्या - वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात घालत होते गस्त; समोरचे दृष्य पाहताच बसला धक्का

यावेळी ११ साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात शासनातर्फे ऍड. विनय आर. घुडे यांनी बाजू मांडली. झालेल्या युक्‍तिवादावरून आरोपी नेहारे याला शिक्षा ठोठावण्यात आली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Life imprisonment for murdering wife on suspicion of character