धक्कादायक! ते दृश्य पाहून त्यांच्या काळजाचा उडाला थरकाप अन् नंतर...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

तालुक्यातील खरबडी येथील शेतकरी शंकर पद्माकर नारखेडे यांची सुलतानपूर शिवारातील गट नंबर 20 मध्ये आठ एकर शेती आहे. या शेतातील लिंबाच्या झाडाखालील झोपडीत अंदाजे पाच क्विंटल कापूस ठेवलेला होता. तर, झाडालगत ठिबक संच व इतर साहित्य होते.

मोताळा (जि.बुलडाणा) : तालुक्यातील सुलतानपूर शिवारातील एका शेतात अचानक वीज कोसळून पाच एकरातील ठिबक संच, कापूस व शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना रविवारी (ता.10) दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. यात पीडित शेतकर्‍याचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

तालुक्यातील खरबडी येथील शेतकरी शंकर पद्माकर नारखेडे यांची सुलतानपूर शिवारातील गट नंबर 20 मध्ये आठ एकर शेती आहे. या शेतातील लिंबाच्या झाडाखालील झोपडीत अंदाजे पाच क्विंटल कापूस ठेवलेला होता. तर, झाडालगत ठिबक संच व इतर साहित्य होते. दरम्यान, रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास या शेतातील झाडावर अचानक वीज कोसळून आग लागली. यावेळी झाडासह झोपडी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. 

आवश्यक वाचा - चिंताजनक! या जिल्ह्याच्या कोरोनामुक्तीच्या आनंदावर काही तासातच विरजन

या आगीत पाच एकरातील ठिबक संच, पीव्हीसी पाइप, पाच क्विंटल कापूस व शेती उपयोगी साहित्य जळून अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पीडित शेतकर्‍याने सांगितले. दरम्यान, वीज कोसळताच परिसरातील शेतकर्‍यांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वार्‍याचा जोर पाहता आगीने रौद्ररूप धारण केले होते. शेतकरी व शेतमजुरांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. 

तोपर्यंत सर्वकाही जळून खाक झाले होते. या घटनेची माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आली असून, सोमवारी सदर नुकसानीचा पंचनामा करण्यात येणार असल्याचे समजते. पीडित शेतकरी शंकर नारखेडे यांची परिस्थिती हलाखीची असून, या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. प्रशासनाने पीडित शेतकर्‍याला तत्काळ आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.

...अन् त्यांच्या काळजाचा थरकाप उडाला
शेतकरी शंकर नारखेडे यांचे नातेवाईक संगीता म्हस्के, अतुल म्हस्के आणि सात मजूर या शेतात कापूस वेचणीचा काम करीत होते. दरम्यान, वादळी वार्‍यासह ढगांचा गडगडाट होऊन अचानक शेतात वीज कोसळली. सदर दृश्य पाहून शेतकरी व मजुरांच्या काळजाचा थरकाप उडाला. सुदैवाने या घटनेत कुठलीच जीवित हानी झाली नाही. वीज कोसळली तेव्हा झोपडीजवळ कुणीच नसल्याने अनर्थ टळल्याचे बोलल्या जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lightning strikes and destroys farm materials in buldhana district