ते रडत रडत म्हणाले, तयार माल गोदामातच पडला काळा, तुम्हीच सांगा आता कसं जगायचं...

The lockdown has eroded the employment of professionals
The lockdown has eroded the employment of professionals

साकोली (जि. भंडारा) : शहरातील तलाव वॉर्डातील बुरड कामागारांची वस्ती... पंधरा ते वीस कुटुंबाचे वास्तव्य... घरातील लहान-मोठ्या व्यक्तींसह सर्वांचे हात नेहमीच बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याच्या कामात गुंतलेले... पण, सध्याच्या परिस्थितीने त्यांचे हात बांधले आहेत... टाळेबंदीमुळे जणूकाही त्यांच्या जीवनाचे रहाटगाडगेही जागच्या जागी थांबले... लग्नसराईचा हंगाम हातातून गेला... व्यवसाय व रोजगार पूर्णपणे बुडाल्याने कमवायचे काय आणि खायचे काय? याची चिंता या वस्तीमधील बुरड कामगारांना सतावत आहे... 

माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत, सणवार, रीती परंपरा जपण्यासाठी लागणारे साहित्य बांबूपासून तयार करण्यात बुरड समाज पारंगत आहे. तालुक्‍यात सुमारे चारशे बुरड कामगार आहेत. बांबूपासून हारे, टोपल्या, सूप, पारडे, डाले व पक्ष्यांसाठी बेंडवे अशा विविध वस्तूंची निर्मिती व विक्री करून त्यांचा चरितार्थ चालतो. आधीच प्लॅस्टिकच्या साहित्यांची स्पर्धा आहे. अशातच कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनची त्यात भर पडली. यावर्षी लग्नसोहळ्यांवर अंकुश असल्याने सूप, पारडे, टोपले यांची मागणी झालीच नाही. लग्नमंडप उभारण्यासाठी वासे आणि बांबूची विक्री थांबली आहे.

बुरड कामगारांना बांबूचा पुरवठा नवेगावबांध येथून केला जातो. त्यापासून सध्या बांबूपासून वस्तू निर्मितीचे काम कसेतरी सुरू आहे. परंतु, तयार माल विकत नसल्याने आर्थिक संकट त्यांच्यापुढे आहे. तेल, तिखट व जीवनावश्‍यक वस्तू खरेदी करून आणाव्या लागतात. किराणा दुकानदार आता उधारी देण्यास तयार नाही. रेशनमधून मिळणारे गहू तांदूळ किती दिवस पुरणार. त्यामुळे जगावे कसे आणि खावे तरी काय, अशी विवंचना त्यांच्यासमोर आहे. 

तलाव वॉर्डातील वस्तीत गणेश, गुलाब, देवानंद, सगुण नागपुरे यांना आपली व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले होते. पडकी घरे, बीपीएल यादीतही नाव नाही. जुने वस्त्र घालून, मिळेल ते अन्न खाऊन जीवन जगणारा बुरड समाज संकटात आहे. त्यांना सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.

माल गोदामात पडून

साकोली येथे भरणाऱ्या आठवडी बाजारात बुरूड कामगार तयार केलेल्या वस्तूंची विक्री करतात. या वस्तूंना बाजारात प्रचंड मागणी असते. तसेच त्यांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी नागपूर ही प्रमुख बाजारपेठ आहे. नागपुरातील अनेक विक्रेते येथून तयार वस्तू घेऊन जातात. कोरोनामुळे सारेकाही ठप्प झाले. नागपूर कोरानाबाधितांच्या संख्येमुळे रेडझोनमध्ये आहे. जिल्हाबंदी व टाळेबंदी असल्याने 
तब्बल 50 हजार रुपयांचा माल गोदामात पडून आहे. 

विक्री झालीच नाही
मार्च ते मे या लग्नसराईच्या तीन महिन्यासाठी जानेवारीपासूनच बांबूच्या वस्तू बनवून साठा केला जातो. मागणी अधिक असल्याने एकाच वेळी माल पुरविणे शक्‍य होत नाही. यावर्षी मार्चमध्येच लॉकडाउन झाल्याने विक्री झालीच नाही. गोदामातील माल सडून काळा पडत आहे. 
- गणेश नागपुरे, 
बुरड कामगार, साकोली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com