esakal | मद्यप्रेमी झिंगाट...उत्साह पाहण्याजोगा; मद्यासाठी लांबच लांब रांगा!
sakal

बोलून बातमी शोधा

liquor line.jpeg

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली.

मद्यप्रेमी झिंगाट...उत्साह पाहण्याजोगा; मद्यासाठी लांबच लांब रांगा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशीम : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले. मात्र, जिल्हा ग्रीनझोनमध्ये मोडत असल्यामुळे आजपासून (ता.6) नियमांचे पालन करून मद्याची दुकाने सुरू करण्यास सवलत देण्यात आली. आज दारूची दुकाने सुरू होताच दुकानांसमोर तळीरामांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. यावेळी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने काही ठिकाणी पोलिस कर्मचारी देखील तैनात करण्यात आले होते.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश आले. जिल्ह्यातील एक कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरा होऊन घरी गेला. त्यामुळे जिल्हा ग्रीनझोनमध्ये आला. दरम्यान लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात मद्याची दुकाने पूर्णतः बंद होती. 

महत्त्वाची बातमी - अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्णांची ‘साठी’ पार​

त्यामुळे तळीरामांना मद्य मिळाले नाही. मात्र, जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून (ता.6) शहरी व ग्रामीण भागातील मद्याची दुकाने सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे तळीरामांमध्ये उत्साह दिसून आला. शहरातील रिसोड नाका भागातील दारूचे दुकान सुरू झाले. त्यामुळे मद्यासाठी तळीरामांनी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लावल्या होत्या. यावेळी शासन- प्रशासनाने ठरवून दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करण्यात आले. गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त होता.

हेही वाचा - माजी गृहराज्यमंत्र्यांची कन्या पुण्यात देतेय कोरोनाविरुद्ध लढा; फ्रंट लाईन वॉरियर म्हणून अविरत सेवा

सकाळपासूनच तळीरामांची गर्दी
रिसोड : जिल्ह्यात परवानाधारक मद्यविक्रीची दुकाने बुधवारी (ता.6)  सुरू झाली. त्यामुळे सकाळी आठ वाजतापासूनच लोणी फाटा परिसरात मद्य विक्रीच्या दुकानासमोर गर्दी झाली होती. ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांतून नागरिक मद्य खरेदीसाठी आले होते. यावेळी शारीरिक दुरावा पाळण्यात न आल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला. मद्याच्या दुकानासमोर तसेच बाजारपेठेतही नागरिकांची एकच गर्दी झाली होती. त्यामुळे काहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली होती. 

मद्य खरेदीसाठी चक्क शेजारील जिल्ह्यातूनही नागरिक दाखल झाले होते. शहरातील गर्दीवरील नियंत्रणासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. पवन बनसोड यांनी आपल्या पथकासह शहर गाठले. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली. मद्यविक्रीच्या दुकानासमोर गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पोलिस कर्मचारी तैनात होते.

तिच्या आगमनाने तळीरामांमध्ये उत्साह
मंगरुळपीर : दारूची दुकाने उघडणार असल्यामुळे तळीरामांमध्ये चांगलाच आनंद दिसून आला. शहरातील एक वाईन शॉप व दुसरे देशी दारूचे दुकान उघडे होते. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी दारूघेण्यासाठी मद्यपींनी सकाळपासूनच गर्दी केली होती. त्यामुळे दारूच्या दुकानांसमोर पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागला. या दोन्ही ठिकाणी ग्राहकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून त्यांना दारू देण्यात आली. यावेळी मंगरुळपीरचे उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, तहसीलदार किशोर बागडे, पोलिस उपविभागीय अधिकारी यशवंत केडगे, ठाणेदार जगदाळे यांनी दुकान परिसरातील ग्राहकांची पाहणी केली. दुपारी दोन वाजता दारू विक्री बंद करण्यात आली.