esakal | असे बघा अनोखे छायाकल्प चंद्रग्रहण 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

ग्रहण हा विषयी कुणासाठीही नवीन नाही. सूर्य व चंद्रग्रहण सर्वांनाच माहिती आहे. पण, ग्रहणाचेही काही अनोखे प्रकार असतात. अशाच प्रकारांपैकी एक असलेले अनोखे छायाकल्प चंद्रग्रहण बघण्याची संधी खगोलप्रेमी, संशोधक, अभ्यासक व निरीक्षकांना शुक्रवारी (ता. 10) मिळणार आहे. त्यामुळे खगोल संशोधन क्षेत्रात कार्यरत संस्था व अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 

असे बघा अनोखे छायाकल्प चंद्रग्रहण 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : शुक्रवारी रात्री 10.37 वा संपूर्ण भारतातून छायाकल्प (पेनम्ब्रल) चंद्रग्रहण दिसणार आहे. या जानेवारी महिन्यातील ग्रहणाला वुल्फ मून एकलिप्स, असे म्हणतात. हे ग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, पूर्व साऊथ आफ्रिका येथूनसुद्धा दिसेल. 

या वर्षाचे हे पहिलेच छायाकल्प चंद्रग्रहण असून या वर्षातील चारही चंद्रग्रहणे छायाकल्प चंद्रग्रहण असणार आहेत. या ग्रहणाची सुरुवात विदर्भातून रात्री 10.37 वाजता होईल, ग्रहण मध्य 12.40 तर ग्रहण समाप्ती 2.42 वाजता होईल. 

दुर्बिणी किंवा टेलिस्कोपने बघावा 

हे ग्रहण साध्या डोळ्याने फारसे चांगले दिसणार नाही. परंतु मोठी द्विनेत्री अर्थात दुर्बिणी किंवा टेलिस्कोपने पृथ्वीची सावली पाहता येऊ शकेल. शुक्रवारच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्याने हे चंद्रबिंब तेजस्वी व विशेष म्हणजे 2.6 टक्‍के मोठे दिसेल. चंद्र जेव्हा पृथ्वीच्या गडद छायेतून जातो तेव्हा खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण घडते. परंतु छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून जातो. त्यामुळे चंद्रावर गडद सावली दिसत नाही. 


शुक्रवारी पौष पौर्णिमा 

खगोलप्रेमींनी या अनोख्या छायाकल्प चंद्रग्रहणाचे निरीक्षण करावे व या अद्‌भूत पण, वैज्ञानिक खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा, असे आवाहन स्काय वाच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी केले आहे. शुक्रवारी पौष पौर्णिमा असून ही शाकंभरी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. या रात्री हे चंद्रग्रहण बघण्याचा योग जुळून आला आहे. 

क्‍लिक करा : गोलमाल है भाई सब गोलमाल है 

आणखी एक नाव 

चंद्र आणि सूर्याच्या मध्ये पृथ्वी आल्यावर चंद्रग्रहण बघता येते. एरवी पृथ्वीची गडद छाया चंद्रावर पडत असल्याने ते खग्रास किंवा खंडग्रास ग्रहण असते. पण, जेव्हा चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेतून प्रवास करतो तेव्हा त्या ग्रहणाला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात. या चंद्रग्रहणाला मांद्य चंद्रग्रहण असेही एक नाव आहे.

 कसं काय बुवा? : सांगा कसे जगायचे? आठ महिन्यांपासून खाण्याचेही वांधे 

म्लान किंवा कमी तेजस्वी

नेहमीच्या चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या दाट छायेत आल्याने काळसर तपकिरी दिसतो. परंतु, छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र फक्त म्लान किंवा कमी तेजस्वी दिसतो. म्हणून त्याला मांद्य चंद्रग्रहणही म्हणतात. पण, शुक्रवारी चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्याने तो फार म्लान किंवा मंद दिसणार नाही. 

loading image