रिंगरोडवर आला बाळ रडण्याचा आवाज, मग सुरू झाली शोधाशोध...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

गोंदिया : एक वर्षाचे बाळ रेल्वे पुलाजवळील रिंगरोडवर रडत असल्याचे ऑटोरिक्षा चालकाला दिसले. त्यांनी आजूबाजूला विचारपूस केली. मात्र, बाळाच्या बाबतीत काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी गोंदिया ग्रामीण पोलिस ठाणे गाठून बाळाला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी तपासचक्रे फिरवून अवघ्या वीस मिनिटांत बाळ आई-वडिलांच्या सुपूर्द केले. यावरून रिक्षाचालकाची समयसूचकता आणि पोलिसांच्या कार्यतत्परतेचा प्रत्यय आला. 

गुरुवारी (ता. 20) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास मनीष सोविंदा डोंगरे (वय 26, रा. दासगाव खुर्द) हे एमएच 35-2986 क्रमांकाच्या ऑटोरिक्षाने बालाघाट टी पॉइंटवरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बायपास रिंगरोडने जात होते. यावेळी रेल्वे पुलाजवळ एक वर्षाचा लहान बाळ रडताना दिसला. त्यांनी समयसूचकता दाखवून त्या मुलास ताब्यात घेतले. 

क्लिक करा - विदर्भावर पुन्हा ढग दाटले... तो पुन्हा येणार... पुन्हा येणार... पुन्हा येणार...

आजूबाजूला व येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना बाळाबाबत विचारपूस केली. मात्र, आई-वडिलांचा व घरच्यांचा पत्ता लागला नाही. त्यामुळे मनीष डोंगरे यांनी मुलाला गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात आणले. गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पथक बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी रवाना केले. पथकाने ऑटोरिक्षा चालक डोंगरे यांना ज्या ठिकाणी हे बाळ रडत असल्याचे आढळले, त्या वस्तीत जाऊन पोलिस गाडीच्या मेगाफोनद्वारे हरविलेल्या बाळाबाबत माहिती दिली. यावरून नागरिक गोळा झाले. हे बाळ राजेश माने (रा. साईनगर, मरारटोली, गोंदिया) यांचे असल्याचे सांगितले. 

बापरे! - Video : स्वप्नात आले शंकरजी... म्हणाले शेतातल्या झाडातून निघेल हे...

यानंतर साईनगर येथे बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेतला. आईवडील व कुटुंबीयांनी बाळ योगांश असल्याचे ओळखले. खात्रीनंतर हे बाळ आई-वडिलांच्या सुपूर्द केले. बाळाला त्याच्या आई-वडिलांच्या सुपूर्द करण्यात सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप अतुलकर, सहायक पोलिस निरीक्षक अभिजित भुजबळ, पोलिस उपनिरीक्षक रोहिदास भोर, पोलिस हवालदार मिलकीराम पटले, पोलिस शिपाई रूपेश कटरे, महिला पोलिस शिपाई प्रमिला ताराम, पोलिस शिपाई घनश्‍याम कुंभलवार यांनी मोलाची भूमिका बजावली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lost baby delivered to parents in 20 minutes at Gondia