संस्कृत भाषा ब्राह्मणांचे पेटंट नाही

Madhusudan Penna says Sanskrit language is not a patent of Brahmins
Madhusudan Penna says Sanskrit language is not a patent of Brahmins

नागपूर : भारतीय वैदिक साहित्य हे संस्कृतमध्येच उपलब्ध आहे. सुदैवाने आपला सर्वांचा जन्म भारतात झाला आहे. आपणच आध्यात्मिक उन्नती साधली नाही तर जगण्याला अर्थ उरणार नाही. दुर्दैवाने संस्कृतचे पेटंट केवळ ब्राह्मणांकडेच असल्याचा गैरसमज आहे. यात तथ्य नसून संस्कृत भाषा सर्वसामान्यांची बोली असल्याचे प्रो. मधुसूदन पेन्ना यांनी सांगितले. 

कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्‍वविद्यालयाच्या भारतीय धर्म, तत्त्वज्ञान आणि संस्कृती संकायाचे अधिष्ठाता प्रो. मधुसूदन पेन्ना यांना संस्कृत महाकाव्य "प्रज्ञाचाक्षुषम्‌'साठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला या पार्श्‍वभूमीवर दै. "सकाळ'शी त्यांनी संवाद साधला. ब्राह्मण संस्कृत बोलत नाहीत. संस्कृत भाषेच्या संवर्धनात ब्राह्मणांचे विशेष योगदानही नाही. त्यामुळे संस्कृतला विशिष्ट चौकटीत पाहणे चुकीचे आहे. ही सर्वव्यापी भाषा असून, डॉ. श्रीकांत जिचकार आणि भूषण कुमार उपाध्याय यांच्यासारखी अनेक उदाहरणे आपल्यात आहेत, असेही प्रो. पन्ना म्हणाले. 

देशातील संस्कृत भाषक एकत्रित आले की, हीच भाषा संपूर्ण देश जोडू शकेल असा विश्‍वास जाणवत असल्याचे सांगताना, सूक्ष्म विश्‍व आणि स्थूल विश्‍वाची व्याख्या संस्कृतने विशद केली. या भाषेची दृष्टी व्यापक आहेच, पण प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांच्या तत्त्वज्ञानाने तिच्या सीमा रुंदावल्या आहेत. शंकराचार्य व रामानुजाचार्य अभ्यासताना विश्‍लेषण किचकट असल्याचे जाणवते. मात्र, गुलाबरावांचे साहित्य संत ज्ञानेश्‍वर महारजांच्या तत्त्वज्ञानाधारित असून, अतिशय सोप्या आणि बोलीभाषेत आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडूत मधुराद्वैत संप्रदायाचे कार्य अन्‌ गुलाबरावांचे कार्य एकच असल्याचे जाणवते. संत गुलाबराव महाराजांना समजून घेणे हे जीवनाचे ध्येय असल्याची इच्छा त्यांनी व्यक्‍त केली. 

सहा भाषांवर प्रभुत्व असलेले पेन्ना यांना जर्मन भाषाही उत्तम अवगत आहे. या बाबत विचारले असता, प्रो. पेन्ना यांनी स्वत:चा प्रवास सांगितला. एमबीएचे शिक्षण घेताना जर्मन शिकलो. पुढे जर्मनीत संस्कृत, इंग्रजी आणि जर्मन या तिन्ही भाषांचे संशोधन करण्याची संधी मिळाली. तिन्ही भाषांचे प्रोटोटाइप एकच असल्याचे जाणवले. संस्कृत भाषेत जेथे "अस्ती' शब्द वापरले जातो, तोच जर्मन लोक "इस्त' असा वापरतात अन्‌ ग्रीक लोक "ऍस्त' असा वापरतात. संस्कृत महाकाव्यात तत्वज्ञान आणि चरित्र दोघांचा समावेश नसतो. मात्र "प्रज्ञाचाक्षुषम्‌' या महाकाव्यात चारशे श्‍लोक संत गुलाबराव महाराजांचे चरित्र कथन केले असून, साडेचारशे श्‍लोक महाराजांच्या तत्त्वज्ञानावर आधारित आहेत. 

'प्रज्ञाचाक्षुषम्‌' संस्कृत महाकाव्याचा इतिहास

शोधप्रबंधासाठी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना प्रो. मधुसूदन पेन्ना यांनी प्रज्ञाचक्षु संत गुलाबरावांच्या साहित्याचा अभ्यास केला अन्‌ संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रो. पेन्ना संत गुलाबरावांच्या साहित्याकडे वळले. वयाची केवळ 34 वर्षे जगलेले संत गुलाबरावांचे महान कार्य त्यांच्या लक्षात आले. जन्मांध असतानाही संत गुलाबरावांच्या साहित्यात सांख्ययोग, न्याय, वेद, व्याकरण, भागवत, पुराण अशा सर्वच विषयांचे सखोल विश्‍लेषण असल्याचे प्रो. पेन्ना यांच्या लक्षात आले. गुलाबराव महाराज स्वत:ला ज्ञानेश्‍वरकन्या म्हणत. तेव्हा त्यांच्या साहित्याचा सर्वांनाच फायदा होईल या उद्देशाने "प्रज्ञाचाक्षुषम्‌' या संस्कृत महाकाव्याची निर्मिती केली असल्याचे प्रो. पेन्ना म्हणाले. 2015 साली सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते महाकाव्याचे लोकार्पण झाले. 

कोण आहेत प्रो. मधुसूदन पेन्ना

प्रो. पेन्ना भारतीय व पाश्‍चात्त्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत. वेदान्त, न्यायशास्त्र आणि योगशास्त्रांचे तज्ज्ञ आहेत. दर्शनशास्त्रासह संस्कृत भाषा, साहित्य, व्याकरण शास्त्रांचे जाणकार व महाकवी आहेत. त्यांनी काव्यकण्ठचरितम आणि प्राज्ञचाक्षुषम या दोन महाकाव्यांसह संस्कृत, इंग्रजी, मराठी आणि तेलुगूतून तीस लघुकाव्यांची रचना केली आहे. 2018 साली कॅनडात झालेल्या जागतिक संस्कृत परिषदेत त्यांनी "गुलाबराव महाराजांच्या वेदांतातील संकल्पना' या विषयावर व्याख्यान दिले आहे. 2019 साली गुजरात सरकारने सोमनाथ ट्रस्टने त्यांना सुवर्णपदकाने गौरविलेले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com