या कंपनीच्या बियाण्यांकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ... काय असावे कारण? 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

जून महिना सुरू होताच बाजारात शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, खते उपलब्ध केले जाते. शेतकरी दोन पैसे अधिक मिळेल अशा वाणाची निवड करतात. राज्य सरकारच्या महाबीज या कंपनीकडूनही ही शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या वाणांची बियाणे उपलब्ध करून दिले जाते.

तुमसर (जि. भंडारा) : खासगी कंपन्यांच्या तुलनेत महाबीज धानाच्या बियाण्यांच्या किंमती अधिक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या ही बियाणे खरेदी करणे परवडत नाही. या कारणामुळे शेतकऱ्यांनी महाबीजच्या बियाण्यांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे विक्रेत्यांचे नुकसान होत आहे. 

जून महिना सुरू होताच बाजारात शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, खते उपलब्ध केले जाते. शेतकरी दोन पैसे अधिक मिळेल अशा वाणाची निवड करतात. राज्य सरकारच्या महाबीज या कंपनीकडूनही ही शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या वाणांची बियाणे उपलब्ध करून दिले जाते. तसेच वेगवेगळ्या खासगी कंपन्यांनी यंदा 50 ते 60 प्रकारचे बियाणे बाजारात उपलब्ध करून दिले आहेत. शेतकऱ्यांना उच्चप्रतीचे बियाणे उपलब्ध करून शेतातील उत्पादन वाढीचा प्रयत्न महाबीज महामंडळ करते. 

मागील वर्षी सरकारने शेतकऱ्यांना महाबीज उन्नत व सुधारित बियाणे 50 टक्‍के अनुदानावर उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा महाबीजच्या बियाणांकडे अधिक कल होता. परंतु, चालू हंगामात महाबीजच्या बियाणे खरेदीवर कोणतीही सवलत दिलेली नाही. यामुळे महाबीजचे बियाणे अन्य खासगी कंपन्यांच्या बियाण्यांपेक्षा प्रतिक्विंटल एक हजार रुपयांनी महाग आहेत. 
बाजारात खासगी कंपनीची धानबियाणांची 25 किलोची बॅग 650 ते 700 रुपयांना मिळते, तर त्याच वाणाच्या महाबीजची बॅग 950 रुपयांना मिळत आहे. यामुळे शेतकरी कमी दरात मिळत असलेले खासगी कंपनीचे बियाणे खरेदी करीत आहेत. 

अवश्य वाचा- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अखेर मॉन्सून विदर्भात दाखल

तालुक्‍यातील बियाणे विक्रेत्यांनी हंगामापूर्वी लाखो रुपयांची गुंतवणूक करून महाबीजचे बियाणे बुक केले आहेत. परंतु, आता हे बियाणे महाग असल्याने शेतकरी खरेदी करीत नाहीत. यामुळे विक्रेत्यांनी साठवलेला माल गोदामातच पडून आहे. बऱ्याच विक्रेत्यांनी व्यापारासाठी बॅंकेतून कर्ज काढून ऍडव्हान्स बुकिंगसाठी पैसे भरले आहेत. हंगामात या मालाची विक्री झाली नाही तर, बियाणे कंपनीला परत पाठविण्याचा खर्चही त्यांना सहन करावा लागणार आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात बाजारात मालाची विक्री झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशावेळी महाबीज कंपनीकडून महागडे बियाणे खरेदी करणे शेतकऱ्यांसाठी अशक्‍य होत आहे. तेव्हा सरकारने या बियाणांच्या किंमती कमी करून त्यावर अनुदान जाहीर करण्याची आवश्‍यकता आहे. 

बियाण्यांवर सवलत द्या 

अनेकदा खासगी कंपन्यांच्या बियाण्यांची उगवत क्षमता व त्यातील भेसळीचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा या कंपन्यांच्या वाणावर विश्‍वास बसत नाही. त्या तुलनेत महाबीज शेतकऱ्यांसाठी विश्‍वासपात्र ठरली आहे. परंतु, त्यामुळे इतर कंपन्यांच्या तुलनेत प्रतिक्विंटल एक हजार ते 1200 रुपये महागडे बियाणे विकणे शेतकऱ्यांवर अन्याय करण्यासारखे आहे. गेल्या पाच वर्षांपासून महाबीजच्या बियाण्यांवर सरकारकडून सवलती दिल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांनाही दिलासा देण्यासाठी बियाण्यांवर सवलत जाहीर करावी, अशी मागणी शासनाकडे केल्याचे ऍग्रो डीलर असोसिएशन भंडाराचे सचिव सुनील पारधी यांनी सांगितले. 

शेतकरी स्वस्त आणि विश्‍वसनीय असलेल्या महाबीज कंपनीचे बियाणे दरवर्षी खरेदी करतात. आता खासगी कंपनी व महाबीज बियाणांच्या किंमतीत मोठी तफावत आहे. बियाणांच्या 25 किलोच्या बॅगच्या मागे 250 ते 300 रुपयांचा फरक आहे. त्यामुळे शेतकरी महाबीजचे बियाणे खरेदी करण्याचा विचार करीत नाही. 
-कलाम शेख 
शेतकरी, कर्कापूर. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahabeej seeds are more costly, so farmers not Afford it