जेव्हा जग साजरा करत होतं थर्टी फर्स्ट तेव्हा 'ते' बजावत होते कर्तव्य; हॅट्स ऑफ महाराष्ट्र पोलिस 

संतोष ताकपिरे 
Friday, 1 January 2021

रात्री दहापर्यंत बार, हॉटेल्स उघडे ठेवू नये असे प्रशासनाचे आदेश असताना सुद्धा काही ठिकाणी बार, हॉटेल्समध्ये नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्ट्यांचेही आयोजन झाले.

अमरावती ः थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी तरुणांचा उत्साह गगनात मावेनासा होता. सर्वजण आपल्या कुटुंबाबरोबर किंवा मित्रांबरोबर नववर्ष साजरा करत होते. मात्र पोलिस कोरोनाच्या काळात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रस्त्यावर अधिक गर्दी होऊ नये याकरिता थर्टी फर्स्टला रात्रीपासून तर, नवीन वर्षाची पहाट उजाडेपर्यंत शहरात रस्त्यावरच होते.

रात्री दहापर्यंत बार, हॉटेल्स उघडे ठेवू नये असे प्रशासनाचे आदेश असताना सुद्धा काही ठिकाणी बार, हॉटेल्समध्ये नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्ट्यांचेही आयोजन झाले. दहाही ठाण्याच्या हद्दीत मुख्य चौकात बॅरिकेटींग करून दुचाकी, कारचालकांची तपासणी करताना पोलिस दिसून आले. आवाहनानंतरही काही उत्साही लोक रस्त्यावर फिरतांना दिसले. पोलिसांनी त्या वाहनचालकांची कसून चौकशी केली. 

नक्की वाचा -'त्यांच्या' गाडीचा हॉर्न ऐकताच महामार्गावर जमतात असंख्य कावळे; याला दातृत्व म्हणावं की मैत्री

अनेकांवर दंडात्मक कारवाई करताना पोलिस दिसून आले. इर्वीनचौक ते राजापेठ आणि शिवाजीनगर ते पंचवटीचौक या मार्गाचे दोन्ही उड्डाणपूल रात्री साडेनऊ पासूनच वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे यावर्षी उड्डाणपुलावर स्टंटबाजी करण्यासाठी कुणी फिरकले नाही. पूर्व व पश्‍चिम वाहतूक पोलिस, दहा ठाण्याचे पथक, गुन्हेशाखेचे पोलिसही मोठ्या संख्येने रस्त्यावर गस्त घालत होते. 

बहुतांश रस्ते पोलिसांच्या दमदार उपस्थितीमुळे रात्री दहापासूनच निर्मनुष्य दिसत होते. अमरावती ते नागपूर महामार्ग, बडनेरा मार्ग, गाडगेनगर परिसर, नांदगावपेठहद्दीत काही बार, हॉटेलमध्ये उशिरापर्यंत ग्राहकांची रेलचेल सुरूच होते. पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी स्वत: काही आस्थापना ज्या नियमबाह्यपणे उघड्या दिसल्या, त्यांच्या मालक, संचालकांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश दिले. 

जाणून घ्या - रामदेव बाबा गेले, अंबानी अडचणीत; मिहान, एमआयडीसीत उद्योजकांचा थंड प्रतिसाद

अनेकांची झाली पंचाईत

उशिरा रात्रीपर्यंत रस्त्यावर फिरणाऱ्यांची पोलिसांनी तपासणी केली. त्यात काही जण मद्यप्राशन करून वाहन चालविताना दिसले. त्यांची जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाली. पोलिसांची मोठ्या संख्येने रस्त्यावर उपस्थितीमुळे अनेकांनांची फजीती झाली.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Police are on duty during new year celebration Trending News