
स्थानिक विश्रामगृहावर महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री सुभाष ठाकरे, आमदार अमित झनक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरेश इंगळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये विषय समित्यांच्या निवडणुका बिनविरोध करण्याचा निर्णय झाला.
वाशीम : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड बिनविरोध झाली. त्यानंतर आज (ता.29) विषय समित्यांच्या सभापतींची निवडही बिनविरोध झाली आहे. महाविकास आघाडीसह भारिप बहुजन महासंघही आता जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी झाला आहे.
येथील जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात विषय समित्यांच्या निवडणुकीसंदर्भात आज (ता.29) विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या पिठासीन अधिकारीपदी उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत होते. विषय समित्यांच्या सभापतीपदांसाठी अपक्ष अरविंद इंगोले, शिवसेनेकडून विजय खानझोडे, काँग्रेसकडून चक्रधर गोटे, भाजपकडून श्याम बढे, काँग्रेसकडून दिलीप मोहनावाले यांनी अर्ज दाखल केले होते. महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शोभा गावंडे, भाजपकडून विनादेवी जयस्वाल, समाजकल्याण समितीसाठी काँग्रेसकडून दिलीप मोहनावाले, भाजपकडून श्याम बढे, भारिप बहुजन महासंघाकडून वनिता देवरे व कल्पना राऊत यांनी नामनिर्देशपत्र सादर केले होते.
बापरे! - भारत बंदला हिंसक वळण, पातूर व बाळापुरात दगडफेक
बैठकीमध्ये झाला निर्णय
स्थानिक विश्रामगृहावर महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री सुभाष ठाकरे, आमदार अमित झनक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरेश इंगळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये विषय समित्यांच्या निवडणुका बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार काँग्रेसचे दिलीप मोहनावाले, अपक्ष अरविंद इंगोले, भाजपचे श्याम बढे, विनादेवी जयस्वाल, कल्पना राऊत यांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले.
आवश्यक वाचा - आमदार रोहीत पवार म्हणतात, शिवशंकरभाऊ हे मॅनेजमेंट गुरू
हे झाले बिनविरोध
विषय समित्यांसाठी पिठासीन अधिकारी प्रकाश राऊत व प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास मानकर यांनी विषय समित्यांच्या सभापतीपदी शिवसेनेचे विजय खानझोडे (काटा गट), काँग्रेसचे चक्रधर गोटे (तोंडगाव गट), महिला बालकल्याण सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शोभा गावंडे (तळप गट), तर समाजकल्याण सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या वनिता देवरे (उंबर्डाबाजार गट) यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
काँग्रेसमध्ये झाले रणकंदन
महाविकास आघाडीच्या मिनीमंत्रालयाच्या सत्तास्थापनेत काँग्रेसला उपाध्यक्षपद मिळाले होते. त्यानंतर विषय समित्यांच्या निवडणुकीत एक पद काँग्रेसकडे येणार होते. काँग्रेसमध्ये या पदासाठी माजी जिल्हा परिषद सभापती चक्रधर गोटे व दिलीप मोहनावाले हे स्पर्धेत होते. आमदार अमित झनक यांनी चक्रधर गोटे यांचे नाव समोर केले. तर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. दिलीपराव सरनाईक यांनी दिलीप मोहनावाले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसमध्ये प्रचंड रणकंदन झाले. मोबाईल फेकाफेकीपर्यंत प्रकरण गेल्यानंतर शेवटी अमित झनक यांचीच सरशी होऊन चक्रधर गोटे हे सभापती झाले.