सत्तेसाठी महाविकास आघाडी एकत्र!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. रविवारी तिन्ही पक्षांच्या जिल्हा प्रमुखांची चर्चा झाली. त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपला सोबत घेण्याबाबतची भूमिका मात्र तिन्ही पक्षांनी स्पष्ट केली नाही. पक्षश्रेष्ठींकडून मिळणाऱ्या निर्देशाप्रमाणे पुढील पावले टाकले जातील, असे तिन्ही पक्षाच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितले.

अकोला : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. रविवारी तिन्ही पक्षांच्या जिल्हा प्रमुखांची चर्चा झाली. त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपला सोबत घेण्याबाबतची भूमिका मात्र तिन्ही पक्षांनी स्पष्ट केली नाही. पक्षश्रेष्ठींकडून मिळणाऱ्या निर्देशाप्रमाणे पुढील पावले टाकले जातील, असे तिन्ही पक्षाच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितले.

जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र राहण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी रविवारी झालेल्या बैठकीबाबत व सत्ता स्थापनेसाठी तिन्ही पक्षांनी सोबत राहण्याबाबत एकमत झाले असल्याचे सांगितले. तिन्ही पक्षांमध्ये प्राथमिक चर्चा आटोपली असून, राज्यात सत्ता स्थापना एकत्र आलो, त्याच प्रमाणे जिल्ह्यातही एकत्र राहू, असे तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी सांगितले. महाविकास आघाडीत 13 सदस्यांसह शिवसेना सर्वांत मोठा पक्ष असून, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे एकूण 7 सदस्य आहेत. सत्ता स्थापनेसाठी एका अपक्षासह भाजपच्या सात सदस्याचे पाठबल आवश्‍यक आहे. महाविकास आघाडीतील 20 आणि एक अपक्ष असे एकूण 21 सदस्य एकत्र असल्याची खात्री झाल्यानंतर भाजप सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेवू शकते, अशी माहिती आहे.

जिल्हा परिषदेचा निर्णय मुंबईत
अकोला जिल्हा परिषदेत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही. भारिप-बमसं 23 सदस्यांसह सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांना सत्ता स्थापनेसाठी चार सदस्यांची आवश्‍यकत आहे. मात्र भारिपला रोखण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र आले आहेत. तिन्ही पक्षांचे स्थानिक प्रमुख नेते लवकरच मुंबईला जाणार आहेत. मुंबईत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते आधी आपआपल्या पक्षांच्या नेत्यांसोबत व नंतर एकत्र बसून निर्णय घेण्याची शक्यता आहे. भाजपला सोबत घेण्याची भूमिकाही त्यानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती आहे.

हेही वाचा - जय जिजाऊ..जय शिवरायांच्या घोषणांनी दुमदुमले मातृतीर्थ 

काँग्रेसने बोलावली आज बैठक
जिल्हा परिषद व पंचायत समित्यामंध्ये सत्ता स्थापनेच्या पृष्ठभूमीवर काँग्रेसने जिल्हा परिषद सदस्य व प्रमुख नेत्यांची सोमवारी बैठक बोलावली आहे. स्वराज्य भवन येथे ही बैठक हाेणार असून, स्थानिक आजी-माजी पदाधिकारी, नवनिर्वाचित सदस्य उपस्थित राहणार आहेत. या बैठकीतही सत्ता स्थापनेबाबत चर्चा होणार आहे.

हेही वाचा - भाजपचे वेट अॅन्ड वॉच, सेनेच्या चर्चा तर वंचितची धाकधूक कायम

भारिपच्या गटनेत्यांची आज निवड
अकोला जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारिप-बमसंच्या जिल्हा परिषदेतील व सातही पंचायत समितीच्या गटनेत्यांची निवड सोमवारी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे.

पक्ष श्रेष्ठींसोबत बैठकीनंतर ठरणार दिशा
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची बैठक झाली. त्यात प्राथमिक चर्चा झाली. पक्ष श्रेष्ठींसोबत होणाऱ्या बैठकीनंतर पुढील दिशा ठरविण्यात येईल.
- आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख, शिवसेना

प्राथमिक चर्चा आटोपली
काँग्रेस महाविकास आघाडीचा घटक आहे. आम्ही एकत्र राहणार आहोत. त्यादृष्टीने प्राथमिक चर्चा आटोपली आहे. काँग्रेस पक्षाच्या बैठकीतही यावर चर्चा होईल.
- हिदायत पटेल, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

 एकत्र राहण्याचा निर्णय
महाविकास आघाडीतील पक्षाच्या जिल्हाप्रमुखांची प्राथमिक चर्चा आटोपली. त्यात सत्ता स्थापनेसाठी तिघांनीही एकत्र राहण्याचा तुर्तास निर्णय घेतला आहे. पुढील निर्णय पक्षश्रेष्ठींसोबतच्या चर्चेनंतर घेतला जाईल.
- संग्राम गावंडे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahavikas alliance together for power in akola