highway
highway

चहूकडे पाणीच पाणी! राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाने फुटली मुख्य पाइपलाइन; नागरिकांमध्ये प्रचंड रोष 

गडचिरोली : शहरातील कासवगतीने सुरू असलेल्या गडचिरोली-चामोर्शी महामार्गाच्या बांधकाम कार्यातील कंत्राटदार कंपनीच्या अक्षम्य चुकांमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. या बांधकामामुळे आधीच धुळीच्या समस्येचा त्रास सहन करावा लागत असताना सोमवार (ता. 15) या महामार्गाच्या बांधकामादरम्यान शहरातील मुख्य पाइपलाइन फुटून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये या कंत्राटदार कंपनीविषयी प्रचंड रोष व्यक्त होत आहे.

सोमवारी येथील राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना जेसीबीमुळे पाण्याची मुख्य पाइपलाइन फुटली आणि त्यातून पाण्याचे मोठे फवारे उडत पाण्याचा अपव्यय सुरू झाला. मात्र, काही नागरिकांनी नगरपरिषदेला माहिती दिल्यामुळे मुख्याधिकारी व पाणीपुरवठा विभागाचे तांत्रिकी प्रमुख यांच्या सतर्कतेने पंप हाऊसवरून पाणीपुरवठा बंद केल्याने पाण्याचा पुन्हा होणारा अपव्यय थांबला. शहरातील चामोर्शी मार्गावर पावसाळ्यापासून थांबलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षांच्या चेतावनीनंतर सुरू करण्यात आले आहे.मात्र हे काम करताना कंत्राटदाराने नियमांची पायमल्ली केली असल्याचा आरोप केला जात आहे. 

वास्तविक महामार्गाचे काम करीत असताना पाण्याची पाइपलाइन, वीज आणि टेलिफोन केबल्स स्थानांतरीत केल्याशिवाय रस्त्याचे मुुुख्य बांधकाम करू नये, असे नियम असताना कंत्राटदाराने नियमांना डावलून काम सुरू केले आहे. या कामाकडे महामार्गाच्या नियंत्रण अधिकाऱ्याचे व महामार्ग प्रशासनाचेही अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. या कामावर अनेक वस्तूंचा नियमबाह्य वापर होताना दिसून येत आहे. नुकतेच गडचिरोलीच्या तहसीलदारांनी अवैध मुरूम उत्खनन केल्यावरून 1 कोटीहून अधिक रुपयांचा दंड ठोठावला आहे. तरीही कंत्राटदार काळ्या गिट्टीचेसुद्धा अवैध उत्खनन करीत असल्याचे समजते. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची चौकशी होण्याची मागणी होत आहे. 

गुरुवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास महामार्गावर काम सुरू झाले आणि सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास जेसीबीद्वारा रस्ता खोदण्याचे काम करीत असताना वीर बाबूराव शेडमाके चौकात जेसीबीचा भाग थेट मुख्य पाइपलाइनवरच आदळल्याने पाइपलाइन फुटली व त्यातून पाण्याचे मोठे कारंजे उडाले आणि पाण्याचा अपव्यय सुरू झाला. मात्र संबंधित जेसीबी चालकाने किंवा कंत्राटदाराच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने याची सूचना नगर परिषदेला दिली नाही. 

या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांपैकी काहींनी ही सूचना मुख्याधिकारी व पाणीपुरवठा विभागाचे तांत्रिक प्रमुख यांना दिल्यानंतर त्यांनी तत्काळ पंप हाउस बंद केले व पाण्याचा अपव्यय थांबविला. त्यामुळे सोमवारी सायंकाळी शहराच्या काही भागाला होणारा पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत हे दुरुस्तीचे काम चालणार असून उद्याच शहराला नियमित पाणीपुरवठा होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे.

हा उद्दामपणा येतो कुठून ?

गडचिरोली-चामोर्शी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाल्यापासूनच हा मार्ग नकारात्मक दृष्टीने चर्चेत आहे. या मार्गाचे काम सुरू असताना अनेक ठिकाणी यापूर्वीही पाइपलाइन फुटल्या आहेत. याच मार्गावरील नवेगाव (रै.) येथील पाइपलाइन फुटल्याने तेथील ग्रामस्थांना गावालगतच्या वैनगंगा नदीवरून पाणी आणावे लागत होते. यासंदर्भात दैनिक सकाळने बातमीही प्रकाशित केली होती. याशिवाय इतरही प्रसार माध्यमांत या महामार्गासंदर्भात बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. तरीही या महामार्ग बांधकामाच्या कार्यशैलीत कोणतेही बदल झाले नाही. कुठल्याही समस्येची दखल न घेता सगळा मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे नेमक्‍या कुणाच्या वरदहस्तामुळे हा उद्दामपणा आला, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com