बदलत्या काळात हरवले मामाचे पत्र; दारावर येणारे पोस्टमनही दुर्मीळ

मिलिंद उमरे
Wednesday, 25 November 2020

पूर्वी पोस्टमनची हाक ऐकू आल्यावर लहान-मोठे धावत यायचे. पोस्टमनचा आदर होत असे. पत्र हाती पडताच घरातील मंडळी आनंदित व्हायची. त्याच आनंदात पोस्टमनच्या हातावर साखर, बत्ताशा, पेढा, असं काही गोडधोड ठेवलं जायचं. बदलत्या काळानुसार पोस्टमनची प्रतीक्षा करण्याची वेळ संपत चालली आहे.

गडचिरोली : ‘मामाचे पत्र हरवले, कुणाला नाही सापडले' हा पूर्वी बच्चेकंपनीचा आवडता खेळ होता. मात्र, काळाच्या ओघात या आवडत्या खेळासोबतच मामाची आणि इतरांची पत्रे, तार, टेलिग्रामही हरवले आहेत. हे सारे घेऊन येणारे पोस्टमन आता दारावर येईनासे झाले असून बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलवरच्या व्हॉट्‌सऍप, फेसबुक, मेसेंजेर, इन्स्टाग्राम अशा समाजमाध्यमांनी त्यांची जागा घेतली आहे.

आजच्या संगणक युगात खाकी गणवेशासह सायकलवर येणारा, दारावर टिकटिक करत पोस्टमन, अशी पहाडी आवाजात साद घालणारा पोस्टमन दुर्मीळ झाल्याचे दिसून येत आहे. बदलत्या काळानुसार पोस्टमनची प्रतीक्षा करण्याची वेळ संपत चालली आहे. दारावर वाजणारी टिकटिक किंवा 'पोस्टमन' हा शब्द कानी पडणे दुर्मीळ होत चालले आहे.

अवश्य वाचा : वैनगंगा नदी पात्रात पर्यटन हब विकसित करा; परिसरातील नागरिकांची मागणी

पूर्वी पोस्टमनची हाक ऐकू आल्यावर लहान-मोठे धावत यायचे. पोस्टमनचा आदर होत असे. पत्र हाती पडताच घरातील मंडळी आनंदित व्हायची. त्याच आनंदात पोस्टमनच्या हातावर साखर, बत्ताशा, पेढा, असं काही गोडधोड ठेवलं जायचं. जणू पोस्टमन कुटुंबातील सदस्यच व्हायचा. कधी दु:खाचे पत्र, निधनाची तार आली, तर तोच पहिल्यांदा सांत्वनही करायचा. परंतु आता मोबाईल, व्हिडिओ कॉलिंग, फेसबुक, व्हॉटसऍप, इ-मेल आदी साधनांमुळे तत्काळ वार्तालाप होत आहे.

मनीऑर्डरही झाल्या बंद

त्यावेळी पोस्टमनच्या हातात एखादा टेलिग्राम दिसला की, मनात भीतीचे वादळ निर्माण व्हायचे. ज्या घरी पोस्टमन पत्र घेऊन जायचा तेथे शेजारी जमा व्हायचे. पत्रामध्ये आनंद असो की, दु:खाचा समाचार असो, सर्व शेजारधर्म पाळत होते. एकेकाळी पोस्टमनला ग्रामीण भागात देवदूत समजले जात होते. अशिक्षित लोकांना पत्र वाचून दाखवणे, मनीऑर्डरचे पैसे बरोबर पोहोचवणे हे पोस्टमनचे काम होते. पण आता मनीऑर्डर जवळपास बंद झाल्यातच जमा आहेत.

एटीएमचा जोर वाढला

शहरी भागासोबत ग्रामीण भागातही जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या खिशात एटीएम कार्ड आहे. हाताखाली मोटारसायकल आली. क्षणात एटीएमवर जाऊन पैसे काढता येऊ लागलेत, परंतु मनीऑर्डर आणणाऱ्या पोस्टमनला पाहून जो आनंद व्हायचा तो आता एटीएममुळे होत नाही. हा सारा रोकडा निर्जीव आर्थिक व्यवहार झाला आहे. त्यामुळे खाकी गणवेशातील पोस्टमन आता क्‍वचितच दिसत आहेत.

जाणून घ्या : ‘मृत्यू जवळ आला आहे, मेडिकलमध्ये चला’; कोरोनाबाधितांना शेवटच्या क्षणी दाखवला जातो रस्ता

आठवणी राहतील कायम

परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे अत्यंत उपयोगी ठरलेली सेवा आता संपुष्टात आली आहे. त्याची जागा मोबाइल, ई मेल आदी अत्याधुनिक साधनांनी घेतली आहे. आता विदेशातील दूर गावी असलेले मित्र, नातेवाईक लॅपटॉप, संगणकावर, मोबाइलवर ऑनलाइन चॅटिंग व व्हिडिओ कॉल करतात. त्यामुळे पोस्टमन दुर्मीळ झाले असून सध्याच्या पिढीच्या बालपणीच्या आठवणीतच ते कायम राहणार आहेत.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mama's letter lost in changing times