esakal | राष्ट्रपिता महात्मा गांधींची तुलना केली चक्क आसारामशी; माथेफिरूविरोधात राष्ट्रवादीने केला गुन्हा दाखल  
sakal

बोलून बातमी शोधा

Man compared Mahatma gandhiji with Aasaram bapu

माथेफिरू समीर केने हा भारतीय जनता पक्ष आणि संघाचा कट्टर कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केली. परंतु, गांधीजींचे विचार ही प्रवृत्ती संपवू शकलेली नाही

राष्ट्रपिता महात्मा गांधींची तुलना केली चक्क आसारामशी; माथेफिरूविरोधात राष्ट्रवादीने केला गुन्हा दाखल  

sakal_logo
By
प्रमोद काकडे

चंद्रपूर : गांधी जयंतीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात समीर केने याने सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते खवळले आहेत. समीर केने नामक या माथेफिरूने महात्मा गांधी यांची तुलना बलात्काराच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या आसाराम बापू यांच्यासोबत केली आहे. यामुळे संतप्त झालेल्या कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहर पोलिस ठाण्यात आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दुर्गापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

माथेफिरू समीर केने हा भारतीय जनता पक्ष आणि संघाचा कट्टर कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केली. परंतु, गांधीजींचे विचार ही प्रवृत्ती संपवू शकलेली नाही. नथुराम गोडसे प्रवृत्तीच्या समीर केने या माथेफिरूने सोशल मिडियावर गांधीजींची तुलना आसाराम बापूशी करून आक्षेपार्ह विधान केले. 

हेही वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला

त्यामुळे चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी यांनी समीर केनेच्या विरोधात अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बहादुरे यांच्याकडे आणि रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. केनेला तत्काळ अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी कॉंग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी नगरसेवक प्रसन्न शिरवार, कुणाल चहारे. राजू वासेकर. पप्पू सिद्दीकी उपस्थित होते. 
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले 

२ ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी समीर केने याने भारतीय नोटांवर छापण्यात आलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या छायाचित्राला व्यंगचित्र असल्याचे संबोधित आक्षेपार्ह लिखाण सोशल मिडीयावर केले. या प्रकाराने भारतीयांची मने दुखावली गेली आहेत. त्यामुळे समीर केनेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार दुर्गापूर पोलिस ठाण्यात शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने दाखल केली आहे. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, महिला शहर अध्यक्ष ज्योती रंगारी, सोशल मिडिया अध्यक्ष नितीन पिंपळशेंडे, किसान सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल कुरेशी, शहर सचिव संजय खेवले, प्रभाग अध्यक्ष मुन्ना तेमबुरकर उपस्थित होते. 

अधिक वाचा - बाल्या बिनेकर हत्याकांड : सहाव्या आरोपीला अटक, सामाजिक कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याची चर्चा

राष्ट्रपित्याची तुलना केली आसारामशी 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारावर देशाने चालावे, असा संदेश दिला आहे. परंतु, त्यांच्याच पक्षातील समीर केने या माथेफिरूने सोशल मिडियावर महात्मा गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले. येवढेच नव्हे तर गांधीजींची तुलना बलात्कारच्या गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूसोबत केली आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून हा गांधीजींचाच नव्हे, तर समस्त भारतीयांचा अपमान आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये, म्हणून या माथेफिरूला तत्काळ अटक करावी, अशी मागणी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ