यवतमाळचा प्रसिद्ध दुर्गोत्सव पोहोचला सातासमुद्रापार; तरुणाने बनवली वेबसाइट; शंभराहून अधिक देशात पसंती

राजकुमार भीतकर
Thursday, 15 October 2020

यवतमाळातील दुर्गोत्सव हा देशातील दुसर्‍या क्रमांकाचा व महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा मानला जातो. येथे मराठी, गुजराती अन् हिंदी भाषिक समूदाय मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. त्यांची शक्तीची देवता दुर्गादेवीवर विशेष श्रद्धा आहे. त्यामुळे यवतमाळात दुर्गोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

यवतमाळ : देशाच्या विविध भागात दुर्गोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा कोवीड महामारीसारख्या संकटातदेखील लोकांमधील भक्ती आणि श्रद्धा तेवढीच कायम आहे. शहरातील विविध भागात दुर्गोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यवतमाळातील दुर्गोत्सवाचे दर्शन जगभरातील भाविकांना व्हावे, म्हणून येथील तरुण चंद्रेश सेता यांनी ’यवतमाळ नवरात्री डॉट कॉम’या नावाची वेबसाइटच तयार केली आहे. या माध्यमातून यवतमाळच्या दुर्गोत्सव सातासमुद्रापार पोहोचला आहे.

यवतमाळातील दुर्गोत्सव हा देशातील दुसर्‍या क्रमांकाचा व महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा मानला जातो. येथे मराठी, गुजराती अन् हिंदी भाषिक समूदाय मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. त्यांची शक्तीची देवता दुर्गादेवीवर विशेष श्रद्धा आहे. त्यामुळे यवतमाळात दुर्गोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येथे गरबा उत्सवही जोरात होतो. विविध कार्यक्रम व देखावे सादर केले जातात. येथील दुर्गोत्सव बघायला अनेकजण यवतमाळात येत असतात. तर, जगभरातील भाविकांना यवतमाळच्या दुर्गोत्सवाचे दर्शन व्हावे, म्हणून येथील चंद्रेश सेता नावाच्या तरुणाने ’यवतमाळ नवरात्री डॉट कॉम’ ही वेबसाइट तयार केली आहे. 

नागपुरातही आहे 'आजीचा ढाबा', दहा रुपयात देते चार डोसा; गरजूंना आहे मदतीची गरज

या वेबसाइटवर 2015 ते 2019 च्या दुर्गोत्सवाचे देखावे व दुर्गादेवीच्या मूर्तीचे सुंदर असे छायाचित्रे उपलब्ध आहेत. तर, दुर्गोत्सवाला सुरूवात होताच यंदा स्थापन केलेल्या दुर्गादेवीच्या मूर्तीचे फोटो आणि विविध देखावे व कार्यक्रमाचे छायाचित्रे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती चंद्रेश सेता यांनी दैनिक ’सकाळ’शी बोलताना दिली. 

दरवर्षी खेड्यापाड्यातून अनेक जण येथील दुर्गोत्सव बघण्यासाठी यवतमाळात येत असतात. यवतमाळ जिल्ह्यात दरवर्षी तीन हजार दुर्गोत्सव मंडळे देवीच्या मूर्तीची स्थापना, आराधना करतात. येथील दुर्गोत्सव महाराष्ट्रात क्रमांक एकचा असण्यामागील खरे कारण म्हणजे येथील मूर्तीकारांनी साकारलेल्या देवीच्या जिवंत मूर्ती आहेत. 

काय आहे वेबसाईट

एकट्या यवतमाळ शहरात दीडशेवर अधिक देवींच्या मूर्तीची स्थापना केली जाते. प्रत्येकच मंडळाची मूर्ती अत्यंत देखणी असते. हा दुर्गोत्सव जगभरात पोहोचविण्यासाठी चंद्रेश सेता यांनी एक ऑक्टोबर 2016 रोजी ’यवतमाळ नवरात्री डॉट कॉम’ नावाची वेबसाइट तयार केली. त्यात दरवर्षी ’अपडेशन’ केले जाते. तर नवरात्रोत्सवाचा इतिहास, येथील विविध मंडळांची नावे, त्यांचे अध्यक्ष, सचिवांसह सदस्यांची माहिती, दुर्गामूर्तीची छायाचित्रे, व्हिडिओ, नवरात्रीतील प्रत्येक दिवसाचे महत्त्व, अशी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या वेबसाईटच्या माध्यमातून कोणत्याही भाविकाला आपल्या मंडळाच्या मूर्तीचा फोटो व व्हिडिओ वेबसाइटवर अपलोड करता येणार आहे. रजिस्टर मंडळांचेच देखावे व छायाचित्रे अपलोड केले जाऊ शकतात. या वेबसाइटचे हे पाचवे वर्षे आहे. जगातील शंभर देशातील नागरिकांनी या वेबसाइटला आजपर्यंत भेट दिली आहे. अमेरिका, रशिया, जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड, ब्राझील, ऑस्ट्रलिया आदींसह भारतातील अनेक नागरिकांनी या वेबसाइटला भेट दिली आहे.

बिअरच्या बाटलीवरील 'क्राऊन कॉर्क' अन् 'ओपनर'चा शोध लावणारी व्यक्ती आहे तरी कोण?

देशात क्रमांक दोनचा म्हणून नावलौकिक मिळालेल्या यवतमाळातील दुर्गोत्सवाला जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचविण्याचा माझा मानस होता. त्यासाठी ’यवतमाळ नवरात्री डॉट कॉम’ही वेबसाइट तयार केली. या माध्यमातून जगातील शंभरपेक्षा जास्त देशातील लोकांपर्यंत यवतमाळातील दुर्गोत्सव पोहोचविता आला. या वेबसाईटच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शनच जगाला करून देण्याचा प्रयत्न आहे. येणार्‍या काळात मूर्तीकारांचे पोर्टफोलीओ, मंडप डेकोरेशन, बँड पथकांचे रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.’
-चंद्रेश सेता,
’यवतमाळ नवरात्री’ वेबसाइटचे निर्माता.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man made website on yavatmal durgotsav