
ते दुचाकीने पुसदला येत असताना पूस नदीच्या बांधाजवळ पतंगाच्या मांजायुक्त धागा मानेला आवळला. परंतु चेहरा व मानेवर गुंडाळलेल्या दुपट्ट्यामुळे त्यांचे प्राण थोडक्यात वाचले. मांजाने अक्षरशः दुपट्ट्याचे चार पदर कापले गेले. 'होता दुपट्टा म्हणून वाचला जीव' असा थरारक अनुभव त्यांना आला.
पुसद (जि. यवतमाळ) : मकर संक्रांतीच्या उबदार वातावरणात पतंग उडविण्याची हौस तशी काही नवी नाही. मात्र, अलीकडे पतंगाच्या चायनीज मांजा लावलेल्या धाग्याने मान कापल्याने अनेकांच्या जीवांवर संक्रांत आली आहे . पुसद येथील प्रा. जगदीश राठोड यांच्यावरही असाच जीवघेणा प्रसंग ओढवला.
ते दुचाकीने पुसदला येत असताना पूस नदीच्या बांधाजवळ पतंगाच्या मांजायुक्त धागा मानेला आवळला. परंतु चेहरा व मानेवर गुंडाळलेल्या दुपट्ट्यामुळे त्यांचे प्राण थोडक्यात वाचले. मांजाने अक्षरशः दुपट्ट्याचे चार पदर कापले गेले. 'होता दुपट्टा म्हणून वाचला जीव' असा थरारक अनुभव त्यांना आला.
जाणून घ्या - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार
येथील गुलाब नबी आजाद समाजशास्त्र महाविद्यालयातील प्रा. जगदीश राठोड यांचे गाव पोहरादेवी. ते पत्नी अरुणासह दुचाकीने रविवार ता.१७ रोजी सायंकाळी ५.४५ दरम्यान पुसद येथे परतताना रामदेव बाबा पेट्रोल पंपासमोरील पूस नदीच्या बांधाजवळ अचानक पतंगाचा मांजायुक्त धागा समोर आला. क्षणात त्यांनी धोका ओळखून दुचाकीचे ब्रेक करकचून लावले. मात्र धाग्याने गळ्याला आवळलेच. परंतु, नेहमीप्रमाणे जगदीश राठोड यांनी तोंडाला व गळ्याला दुपट्टा गुंडाळलेला होता. मांजायुक्त धाग्याने दुपट्ट्याच्या कापडाचे चार पदर कापले गेले. सुदैवाने थोडक्यात निभावले. ओठाला थोडी जखम झाली. दुपट्टा नसता तर... गळा क्षणात चिरल्या गेला असता, या विचाराने प्रा. जगदीश हादरून गेले. रस्त्यावर अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणारे वाहनचालक संतापले . परंतु खरा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांच्याही जिवाचा थरकाप उडाला.
या प्रकाराची तक्रार करण्यासाठी प्रा. जगदीश राठोड यांनी रात्रीला शहर पोलिस स्टेशन गाठले. मात्र, ड्युटीवरील पोलिसांनी चक्क त्यांचा रिपोर्ट घेण्यास नकार दिला. " कोणाच्या विरुद्ध रिपोर्ट देणार? अशा छोट्या मोठ्या गोष्टी तर होतातच ", या शब्दात त्यांची बोळवण केली. कायद्याची बूज राखणारे पोलीसच जीवघेणे गंभीर प्रकारा विरुद्ध तक्रार नोंदवत नसतील तर सामान्य माणसाने कुठे जावे? असा प्रश्न प्रा. जगदिश यांना पडला. त्यांनी ही घटना सहप्राध्यापक स्वाती वाठ यांना सांगितली. त्यांनी 'फेसबुक' वरून या गंभीर प्रकाराची वाच्यता करून पोलिसांच्या मानसिकतेची पोल खोलली.
असाच प्रकार येथील शिक्षक एस. पी. जाधव यांच्याबाबतीत मकर संक्रांतीला याच पूस बांधाजवळ घडला. त्यांच्या डोळ्याला जखम झाली. मात्र सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. चायनीज मांजायुक्त धागा वापरण्याची सक्त मनाई असताना त्याची विक्री कशी होते? विक्रेत्यांवर कारवाई का होत नाही, पोलीस या गंभीर प्रकाराची दखल घेत नसेल तर वरिष्ठांनी पोलिसांवरच कारवाई करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.
संपादन - अथर्व महांकाळ