अतिशय दुर्दैवी! हे मेळघाट की मृत्यूंचे आगार; 27 वर्षांपासून 305 गावांत मृत्यूचे तांडव.. वाचा सविस्तर 

Many People died in melghat from last 23 years
Many People died in melghat from last 23 years

अचलपूर(जि. अमरावती) :  निसर्गाने नटलेल्या व दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश असलेल्या मेळघाटात गेल्या 27 वर्षांपासून 305 गावांतील मृत्यूचा सिलसिला अद्यापही थांबलेला नाही. 1993 पासून सुरू झालेली ही मालिका आजही कायम आहे. गेल्या दोन दशकांत मेळघाट हा मृत्यूचा आगार ठरला आहे. सरकार, अधिकारी, प्रशासनातील कर्मचारी तसेच जग बदलले, मात्र मेळघाटचे वास्तव बदलत नसल्याची धक्कादायक स्थिती आहे.

चिखलदरा तालुक्‍यातील 153 तर धारणी तालुक्‍यातील 152 गावे, अशा एकूण 305 गावांचा मेळघाट आहे. याठिकाणी मुलांच्या मृत्यूचा सिलसिला एकाही सरकारला थांबविता येत नसेल तर या सरकारांना यशस्वी तरी कसे म्हणायचे? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. कॉंग्रेस सत्तेत असताना मेळघाटचा प्रश्‍न समोर आला. विरोधक म्हणून भाजप व सेनेच्या नेत्यांनी कित्येकदा या मुद्यावरून सरकारांना धारेवर धरले. त्यानंतर भाजप-शिवसेनेची सत्ता आली, तरीसुद्धा मेळघाटचे वास्तव तसूभरही बदलले नाही. गेल्या 27 वर्षांत मेळघाटात अब्जावधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र मृत्यूचे तांडव कमी होत नसल्याची स्थिती आहे. 

मेळघाटमध्ये नेमके काय केले तर समस्या संपुष्टात येईल हे राज्यकर्त्यांना कळत नाही, अशातलाही भाग नाही. येथे प्रत्येक सरकारी रुग्णालयात डॉक्‍टर हवेत, उपचाराच्या सोयी हव्यात, आदिवासी बांधवांना कामाच्या बदल्यात सकस आहार देणारी यंत्रणा हवी, येथील महिलांची काळजी घेणारी, त्यांच्यातील अंधश्रद्धा दूर करणारी प्रशासकीय व्यवस्था हवी.

या साऱ्या साध्या साध्या बाबी आहेत. तरीही त्या अंमलात आणल्या जात नाहीत. या मूलभूत उपायांच्या अमलबजावणीकडे दुर्लक्ष करून मेळघाटात हे करू, ते करू, वायफाय देऊ अशा वायफळ घोषणा केल्या जातात. मेळघाटात पायाभूत सोयी निर्माण करायला व मागेल त्याला काम देऊ शकू, अशी यंत्रणा निर्माण करायला फार पैसा लागेल अशातलाही भाग नाही, तरीही ते आजवर होऊ शकले नाही.

चार महिन्यांत 113 मृत्यू

चालू वर्षात जुलैपर्यंत 70 बालमृत्यू झाले असून मातामृत्यू 5 व उपजतमृत्यू 38 झाले आहेत. एप्रिल ते जुलै चार महिन्यांतील ही धक्कादायक आकडेवारी आहे. त्यामुळे महिन्याला 28 जणांचा मेळघाटात बळी जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.

कुपोषण, बालमृत्यू टाळण्यासाठी बालकाला लागणाऱ्या कॅलरीसाठी अंगणवाडीतून देण्यात येणारा आहार हा पूर्ण बालकांच्या पोटात गेला पाहिजे, जेणेकरून बालक सुदृढ जन्माला येईल तसेच मातामृत्यू कमी करण्यासाठी कमी वयात होणारे लग्न टाळले पाहिजे. अपत्याच्या संख्येवर बंधणे आली पाहिजेत आणि दोन मुलांच्या जन्मामध्ये अंतर असणे आवश्‍यक आहे. या सर्व बाबी गांभीर्याने पाळल्यास मातामृत्यू, बालमृत्यू तसेच कुपोषणाला आळा निश्‍चितच बसू शकतो.
-डॉ. दिलीप पांडे,
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, धारणी.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com