अमरावती विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेचा पहिल्याच दिवशी गोंधळ, अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

योगेश दहेकर
Tuesday, 20 October 2020

प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना ऍडमिशन कार्ड व कोणत्या अ‌ॅपमधून परीक्षा द्यायची त्याचे सखोल मार्गदर्शन केले होते. विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी म्हणून सकाळी साडेबारा वाजतापासून यूजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करायला सुरुवात केली. परंतु, तीन वाजेपर्यंत 70 टक्के विद्यार्थ्यांचे लॉगिन झाले नाही.

मांगलादेवी (जि. यवतमाळ ): अमरावती विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेचा आज (मंगळवार)पहिला दिवस होता. मात्र, पहिल्याच दिवशी परीक्षेचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. अनेक विद्यार्थ्यांचे लॉगिन झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना फोन करून महाविद्यालयात बोलाविण्यात आले. त्यातही वाहनांची सुविधा नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले.

हेही वाचा -आंतरराष्ट्रीय शेफ डे : नववीत असताना घडलेल्या एका प्रसंगानं विष्णू मनोहर बनले प्रसिद्ध शेफ

प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना ऍडमिशन कार्ड व कोणत्या अ‌ॅपमधून परीक्षा द्यायची त्याचे सखोल मार्गदर्शन केले होते. विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी म्हणून सकाळी साडेबारा वाजतापासून यूजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करायला सुरुवात केली. परंतु, तीन वाजेपर्यंत 70 टक्के विद्यार्थ्यांचे लॉगिन झाले नाही. त्यामुळे विद्यार्थी घाबरले. त्याचवेळी महाविद्यालयामधून प्रत्येक विद्यार्थ्यांना फोन यायला लागले. तुम्ही काहीही करा. पण, साडेतीन वाजेपर्यंत विद्यालयामध्ये पोहोचा. पेपरमध्ये नापास झालेतर महाविद्यालय जबाबदार राहणार नाही, असे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या प्रश्न असल्यामुळे खेड्यापाड्यातून विद्यार्थी महाविद्यालयात जायला निघाले. मात्र, कोरोनामुळे वाहन उपलब्ध नव्हते. ज्यांच्याकडे वाहन होते, त्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय गाठले. प्रत्येक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे दिसत होता.  

हेही वाचा - काय आहे इकॉर्निया वनस्पती? कशी करते भूगर्भातील पाण्याची पातळी कमी?

पहिल्याच दिवशी विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेचा उडालेला फज्जा पाहून पुढील तीन पेपर बाबत काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व बाबीकडे लक्ष देण्याची व विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करता ऑनलाइन परीक्षा रद्द करावी किंवा पोर्टलमध्ये दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. तसेच आज जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाही किंवा महाविद्यालयापर्यंत पोहोचू शकले नाही. अशा विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा,अशी मागणी सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many student face problems during online exam of amravati university