वैनगंगेच्या महापुरामुळे हाहाकार, भंडारा जिल्ह्यात निर्माण झाली ही स्थिती...

दीपक फुलबांधे
Sunday, 30 August 2020

पूर्व विदर्भात गुरुवार व शुक्रवारी संततधार पाऊस झाला. यामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. तसेच जवळच्या मध्य प्रदेश व गोंदिया जिल्ह्यातही अतिवृष्टी झाली. त्यामुळे संजय सरोवर, कालिसराड, पूजारीटोला या धरणांमधून सतत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच जिल्ह्यातील बावनथडी धरण पूर्ण भरले असून, त्यातूनही बावनथडी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

भंडारा  : अतिवृष्टीनंतर तुडूंब भरलेल्या मध्य प्रदेश व गोंदिया जिल्ह्यातील धरणांमधून सतत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे वैनगंगा नदीला महापूर आला आल्याने तुमसर, मोहाडी व भंडारा तालुक्‍यांतील नदीकाठावरील गावांत पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने पवनी व लाखांदूर तालुक्‍यांतही वैनगंगा धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहे. या परिस्थितीमुळे अनेक गावे-वस्त्या पाण्याखाली आल्या आहेत. जिल्ह्यातील सुमारे 2500 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
 
पूर्व विदर्भात गुरुवार व शुक्रवारी संततधार पाऊस झाला. यामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. तसेच जवळच्या मध्य प्रदेश व गोंदिया जिल्ह्यातही अतिवृष्टी झाली. त्यामुळे संजय सरोवर, कालिसराड, पूजारीटोला या धरणांमधून सतत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच जिल्ह्यातील बावनथडी धरण पूर्ण भरले असून, त्यातूनही बावनथडी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणांचे पाणी तुमसर तालुक्‍यातील बपेरा परिसरात वैनगंगेला मिळते.

अधिक माहितीसाठी - काय सांगता! या गावात पडला चक्क मासोळ्यांचा पाऊस...लोकांच्या घरावर, अंगणात मासोळ्याच मासोळ्या
 

सर्वच नद्यांना पूर आल्यामुळे वैनगंगा नदी शनिवारी सकाळपासून धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहे. तुमसर व मोहाडी तालुक्‍यातील बपेरा, चारगाव, मांगली, पिपरीचुन्नी, खैरलांजी, सितेपार, सुकळी नकुल, बाह्मणी, बोरी, तामसवाडी, मुंढरी, देव्हाडा, निलज, हिवरा, बेटाळा आदी गावांत पुराचे पाणी शिरले. या गावांतील 60 कुटुंबांना शनिवारी सायंकाळी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
       

वैनगंगा आली शहरात

वैनगंगा नदीचा पूर भंडारेकरांसाठी नवा नाही. मात्र, शनिवारपासून वैनगंगेच्या पात्रातील पुराचे पाणी सातत्याने शहराकडे सरकत आहे. सकाळी बैलबाजार, जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आले होते. सायंकाळी टाकळी परिसरात राज्यमार्गावर आणि रात्री नागपूर नाका परिसरातील नाल्याच्या पुलावर पाणी आले. त्यानंतर भंडारा नगर परिषदेच्या क्षेत्रातील ग्रामसेवक कॉलनी, कस्तुरबा गांधी वॉर्ड, मेंढा परिसरात गुरुनानक वॉर्ड, सिंधी कॉलनी टाकळी येथील भगतसिंग वॉर्ड येथे पुराचे पाणी शिरले. शहराजवळील गणेशपूर, बेला, भोजापूर आणि नदीच्या दुसऱ्या काठावरील कारधा येथे पाणी शिरले आहे. नगर प्रशासनाद्वारे समाजभवन शारदा मंदिर, बस स्थानक, वेदांत लॉन, बावणे कुणबी समाजभवन, निशा विद्यालय नगर परिषद गांधी विद्यालय या ठिकाणी स्थलांतरितांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे. 

 

घरांत शिरले पाणी 

शहरातील तकीया वॉर्ड, कपिलनगर येथे वैनगंगेच्या पुराचे पाणी शिरले. त्यामुळे 50 ते 60 घरे बुडाली. या नागरिकांच्या घरातील वापराच्या वस्तू व अन्नधान्याची मोठी नासाडी झाली. येथील लोकांनी बाहेर मिळेल तिथे आश्रय घेतला आहे. इतकी भयानक पूरस्थिती असूनही नगरसेवकांनी साधे फिरकूनही पाहिले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप दिसून येत आहे. 

 

लोहारा, पिपरी, सालेबर्डीत पूर

जवाहरनगर : परिसरातील लोहारा मुख्य रस्त्यावरील सांड नदीच्या पुलावर शनिवारपासून चार फूट पाणी वाहत आहे. यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. सुमारे 700 लोकसंख्या असलेल्या या गावातील बहुतेक कुटुंबाला कोंढी येथील ग्रामविकास हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे हलविण्यात आले. पेवठा येथील कुटुंबीयांना सावरी येथे संत शंकर महाराज आश्रमात हलविण्यात आले आहे. काही लोकांनी घरी पाळीव जनावरे सोडून जाण्यास विरोध केला होता. मात्र, नंतर त्यांना समजावून आणण्यात आले. तसेच पिपरी, सालेबर्डी, चिचोली, पेवठा आदी गावातील अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. 

वाचा - सावधान! सर्वात मोठ्या धरणाचे 33 दरवाजे उघडले.. इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग; जिल्ह्यात पुराचा धोका वाढला
 

तिड्डीचे पुनर्वसन करा

मानेगाव : जवळच्या तिड्डी शिवारात वैनगंगा व कन्हान या नद्यांचा संगम आहे. वैनगंगेला आलेल्या महापुरामुळे तिड्डी येथील नदी काठावरील घरांमध्ये पाणी शिरले. बहुतांश घरांत पाणी आल्याने या लोकांची राहण्याची व्यवस्था गावातील जिल्हा परिषद शाळेत केली आहे. या गावाचे पुनर्वसन करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तिड्डी येथे पाणी आल्याने उपविभागीय अधिकारी भस्के, तहसीलदार पोयाम, तलाठी संगीता भेंडारकर यांनी घरांची पाहणी केली. नुकसानाचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत. 
 

अनेक गावे पाण्याखाली 

वैनगंगा नदीला पूर आल्याने मोहाडी तालुक्‍यातील अनेक  गावांचा संपर्क तुटला असून नदीकाठावरील गावांत पुराचे पाणी शिरले आहे.  मुंढरी बुज., मुंढरी खुर्द, कान्हळगाव ही गावे नदी काठावर आहेत. दोन दिवसांपासून वैनगंगेला पूर आला आहे. शनिवारी पूर वाढत असल्याने मुंढरीचे सरपंच एकनाथ चौरागडे, सरिता चौरागडे यांनी तहसीलदार बोंबुर्डे, ठाणेदार नीलेश वाजे यांनी कुंभार टोली येथील काही कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी बाहेर काढले. रविवारी कान्हळगाव येथील काही पाळीव जनावरे पुरात वाहून गेल्याची माहिती आहे. गावात पुराचे पाणी शिरले आहे. मुंढरी बुज.येतील कुंभार टोलीवर पाणी शिरले. 600 कुटुंबांना शाळेत आणले आहे. पुराचे पाणी सतत वाढत असल्याने हाहाकार उडाला आहे. करडी येथील गरदेवपर्यंत पाणी आल्याने पूर्ण मार्ग बंद झाले आहेत.

 

नदीकाठावरील गावांना वाढला धोका

तुमसर तालुक्‍यातील जवळपास 18 ते 20 गावे नदीकाठावर आहेत. यामुळे बपेरा, चुल्हाड, देवरीदेव आदी गावातील हजारो एकर शेती पाण्याखाली आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आज तामसवाडी, सितेपार, नवरगाव, बोरी, कोष्टी, बाह्मणी या गावात पाणी शिरले. तमासवाडी गावाला बेटाचे स्वरूप आले आहे. गावकऱ्यांचा संपर्क तुटला आहे. वैनगंगेने रुद्र अवतार धारण केल्यामुळे नदीकाठावरील 18 ते 20 गावे धोक्‍यात आली आहेत. त्यामुळे त्वरित उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. 
 

 

गोसेखुर्दमधून विक्रमी विसर्ग

भंडारा : वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साठवले जात आहे. त्याचे बॅकवॉटर भंडारा शहर व नदीकाठावरील गावांत शिरले आहे. गोसेखुर्द धरणाची सर्व 33 दारे सतत तीन दिवसांपासून उघडण्यात आली आहे. शनिवारपर्यंत साडेतीन मीटर उघडलेली दारे आज, रविवारी पाच मीटरपर्यंत उघडण्यात आली आहेत.रविवारी दुपारी या धरणाचे 13 दारे पाच मीटर व 20 दारे साडेचार मीटर उघडली होती. त्यामुळे 30 हजार 117 क्‍यूमेक्‍स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पवनी व लाखांदूर तालुक्‍यात वैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे.

संपादित : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many villages under water due to flooding of Wainganga river