प्राचार्यांनी साकारले 'कॉलेज तळे'; अभिनव उपक्रमाची विद्यापीठाकडून प्रशंसा

योगेश फरपट
शुक्रवार, 7 जुलै 2017

महाविद्यालयासह परिसरातील पाण्याची समस्या कायम निकाली काढण्यासाठी दर्यापूर येथील जे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांनी "कॉलेज तळे' ही संकल्पना साकारली आहे. प्राचार्यांच्या या अभिनव उपक्रमाची विद्यापीठानेही प्रशंसा केली आहे.

अकोला - महाविद्यालयासह परिसरातील पाण्याची समस्या कायम निकाली काढण्यासाठी दर्यापूर येथील जे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांनी "कॉलेज तळे' ही संकल्पना साकारली आहे. प्राचार्यांच्या या अभिनव उपक्रमाची विद्यापीठानेही प्रशंसा केली आहे.

जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभावीपणे राबवल्याने यावर्षी पाणीटंचाईच्या झळा कमी जाणवल्या. टॅंकरची संख्या सुद्धा अत्यल्प राहीली. जलयुक्त शिवार या योजनेतून प्रेरणा घेवून आपणही काहीतरी करायला पाहिजे असा विचार श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या दर्यापूर येथील जे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांच्या मनात आला. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कॉलेज तळे करण्याचा निर्णय घेतला. आपल्या सहकारी प्राध्यापकांसोबत चर्चा करून त्यांनी मार्च महिन्यात नियोजन केले. यासाठी डॉ. अरूण चांदूरकर, डॉ. नरेंद्र माने व हेमंत राऊत यांच्या मार्गदर्शनात रासेयो अंतर्गत जे डी पाटील कॉलेजची इमारत व परिसरातील पाणी साठवण्यासाठी कॉलेज तळे तयार करण्यात आले.

अवघ्या तीन महिन्याच्या श्रमदानातून हे कॉलेजतळे साकारल्या गेले आहे. विशेष म्हणजे शासनाकडून कोणतेही अनुदान यासाठी घेतले नाही. केवळ प्राचार्यांची जिद्द, विद्यार्थी, शिक्षकांच्या श्रमदान व वर्गणीतून हे कॉलेजतळे तयार होवू शकले आहे. कॉलेज तळ्याची अभिनव संकल्पना राज्यात प्रथम साकारल्याबद्दल श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरूण शेळके, उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, सुरेश ठाकरे यांनी प्रशंसा केली केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते स्पॉट व्हेरीफिकेशन अमरावतीचे तत्कालीन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्यालयातील जागेची पाहणी करून स्पॉट व्हेरीफिकेशन केले होते. तळ्याच्या निर्मीतीसाठी नेमके काय करायला पाहिजे याचे मार्गदर्शन केले होते.

तळ्याच्या काठावर बांबूंची लागवड
या तळ्याच्या काठावर निरी नागपूरच्या सहाय्याने बांबूची लागवड करण्यात येत आहे. यासाठी प्रा.डॉ.अतूल बोडखेंचे सहकार्य लाभले आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात कॉलेजमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण व्हायचा. कॉलेजचा परिसर एक्करचा असल्याने बरीच जागा वापरल्या जात नव्हती. याचा फायदा घेत आम्ही कॉलेज तळे करण्याचा निर्णय घेतला. महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे कॉलेज तळे साकारल्या गेले.
- डॉ.रामेश्वर भिसे

Web Title: marathi news akola news water drought sakal news vidarbha news