अकोल्यात तीनशे हातपंप बंद; लाखाेंचा खर्च पाण्यात

सुगत खाडे
रविवार, 11 मार्च 2018

अकोल्यात ग्रामीण जनतेची पाणी टंचाईपासून सुटका झाली नसल्याचे वास्तव आहे. ग्रामीण भागात बनवण्यात आलेल्या आतापर्यंतच्या विंधन विहीरी व कुपनलिकांची संख्या चार हजार 902 आहे. त्यावर शासनाचे लाखाे रूपये खर्च झाले आहेत. परंतु त्यानंतर सुद्धा जिल्ह्यातील 309 हातपंप कायमस्वरूपी बंद आहेत. 

अकाेला - जिल्ह्यातील 848 गावांंमध्ये विंधन विहिरी व कुपनलिकांवर लावण्यात आलेल्या हातपंपांपैकी 309 हातपंप गेल्या कित्येक महिन्यांपासून कायमस्वरूपी बंद पडलेले आहेत. त्यामुळे त्यावर करण्यात आलेल्या खर्चासह इतर खर्च पाण्यातच गेल्याचे दिसून येत आहे. परंतु, त्यानंतर सुद्धा ग्रामीण जनतेची पाणी टंचाईपासून सुटका झाली नसल्याचे वास्तव आहे.

जिल्ह्यातील अकाेला, अकाेट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी व मूर्तीजापूर तालुक्यात राहणाऱ्या नागरिकांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामाेरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांना काेणत्याही परिस्थितीत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागासह इतर शासकीय यंत्रणांमार्फत प्रयत्न करण्यात येतात. गावातच नागरिकांना सहजतेने पाणी उपलब्ध व्हावे यासाठी विंधन विहिरी किंवा कुपनलिकावर हातपंप लावण्यावर पाणी पुरवठा विभागाचा अधिक भर असताे. त्यासाठी प्रत्येक वर्षी पाणीटंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱ्या उपाययाेजनातून लाखाे रूपये खर्च करण्यात येतात. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामीण भागात बनवण्यात आलेल्या आतापर्यंतच्या विंधन विहीरी व कुपनलिकांची संख्या चार हजार 902 आहे. त्यावर शासनाचे लाखाे रूपये खर्च झाले आहेत. परंतु त्यानंतर सुद्धा जिल्ह्यातील 309 हातपंप कायमस्वरूपी बंद आहेत. त्यामध्ये अकाेला तालुक्यातील 67, बार्शीटाकळी 59, अकाेट 29, तेल्हारा 26, बाळापूर 33, पातूर 39 व मूर्तीजापूर तालुक्यातील 56 हातपंपांचा समावेश आहे. तीनशेवर हातपंप कायमस्वरूपी बंद पडल्यामुळे शासनाचे लाखाे रूपये पाण्यात गेले आहेत, परंतु त्यानंतर सुद्धा नागरिकांना पाणी टंचाईपासून ‘दिलासा’ मिळाला नसल्याचे दिसून येत आहे.

'जिल्ह्यातील ग्रामीण भागात बनवण्यात आलेल्या हातपंपांपैकी 309 हातपंप कायमस्वरूपी बंद आहेत. त्याबराेबरच 135 विंधन विहिरी, कुपनलिका काेरड्या पडल्या आहेत. गेल्या महिन्यात करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणातून ही माहिती समाेर आली आहे,' असे मत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद अकाेल्याचे प्रभारी कार्यकारी अभियंता किशाेर ढवळे यांनी व्यक्त केले. 

शंभरावर विंधन विहिरी काेरड्या - 
ग्रामीण भागात बनवण्यात आलेल्या विंधन विहीरी व कुपनलिकांपैकी 135 विंधन विहिरी व कुपनलिका काेरड्या पडल्या आहेत. त्यामध्ये अकाेला तालुक्यातील 26, बार्शीटाकळी 30, अकाेट सहा, तेल्हारा तीन, बाळापूर 16, पातूर 36 तर मूर्तीजापूर तालुक्यातील 18 चा समावेश आहे. पाण्याची पातळी 120 फुटापेक्षा जास्त खाली गेल्यामुळे व काही ठिकाणी जमिनीत पाणीच लागले नसल्याने शंभरावर विंधन विहिरी व कुपनलिका काेरड्या पडल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

29 विद्युत पंप निकामी -
पाणी टंचाई निवारण करण्यासाठी ग्रामीण भागात बनवण्यात आलेले जवळपास 29 विद्युत पंप कायमस्वरूपी बंद पडले आहेत. त्यामध्ये अकाेला, बार्शीटाकळी, तेल्हारा तालुक्यातील तीन-तीन, बाळापूर तालुक्यातील 10, अकाेट चार, मुर्तीजापूर पाच तर पातूर तालुक्यातील एका विद्युत पंपाचा समावेश आहे. संबंधित विद्युत पंप हे कुपनलिका व विंधन विहिरींवर बसवण्यात आले हाेते.

लाखाेंचा खर्च व्यर्थ - 
पाणीटंचाई निवारणार्थ आतापर्यंत बनवण्यात आलेल्या चार हजार 902 विंधन विहिरी व कुपनलिकांपैकी 309 कायमस्वरूपी बंद, 135 काेरड्या पडल्या आहेत. त्याबराेबरच 29 विद्युत पंप कायस्वरूपी बंद पडले आहेत. त्यामुळे संबंधित उपाययाेजनांवर करण्यात आलेला लाखाे रूपयांच खर्च व्यर्थ गेला आहे. लाखाे रूपये खर्च केल्यानंतर सुद्धा ग्रामीण जनतेला त्याचा काहीच उपयाेग झाला नसल्याचे सुद्धा दिसून येत आहे. 

Web Title: marathi news vidarbha akola hand pump off lakh rupees waste