esakal | बाजारपेठा सामसूम; गर्दी पांगविण्यासाठी पोलिस उतरले रस्त्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शासकीय कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी केवळ पाच टक्केच कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आदेश देण्यात आले.

बाजारपेठा सामसूम; गर्दी पांगविण्यासाठी पोलिस उतरले रस्त्यावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ  : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात सोमवार, (ता.23) पहाटे पाचपासून कलम-144 (संचारबंदी) चे आदेश लागू केले आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठांमधील चित्र सामसूम दिसत होते. तर, गर्दी पांगविण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. "लॉक आउट'दरम्यान घडणाऱ्या घडामोडींवर पोलिस प्रशासनाची करडी नजर आहे.

 बघा, नागपूरच्या विलगीकरण कक्षातील स्वच्छता, कसा बरा होणार पेशंट?


काहींना पोलिसी प्रसादही

खासगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. सर्व प्रकारच्या प्रार्थनास्थळाला बंद करण्यात आले आहे. 'लॉक आउट'मधून अत्यावश्‍यक सेवेला वगळण्यात आले आहे. किराणा, अन्नधान्य, फळे, भाजीपाला, दूध, औषधी आदी जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यात आली आहेत. गरज नसताना शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्यांना माघारी परत पाठविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डी. एम. सिंह, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दुपारी बसस्थानक चौकात भेट देऊन नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले. सकाळी अपर पोलिस अधीक्षक नुरूल हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर, पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, यवतमाळ शहरचे ठाणेदार धनंजय सायरे, अवधूतवाडीचे ठाणेदार आनंद वागतकर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी आर्णी रोड, दारव्हा नाका, वाघापूर, बसस्थानक, दत्त चौक, लोहारा, कळंब चौक आदी परिसरात पेट्रोलिंग केली. नागरिकांनी मास्क लावूनच बाहेर फिरावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी काही दुचाकी चालकांना काय काम आहे, अशी विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे काहींना पोलिसी प्रसादही मिळाला. 'जनता कर्फ्यू'नंतर दुसऱ्या दिवशी शहरातील नेताजी मार्केट, टांगा चौक, मेन लाइन या प्रमुख भागातील बाजारपेठ कडकडीत बंद होती. 

बंदोबस्तातील खाकी वर्दीसाठी ते आले घराबाहेर, माणुसकीचा धर्म जिवंत

बसची चाके थांबली

'जनता कर्फ्यू'दरम्यान राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद होती. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कलम-144 लागू करण्यात आले. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी आजपासून पुढील आदेशापर्यंत बससेवा बंद करण्यात आली आहे. बसची चाके थांबल्याने काही नागरिकांना आल्यापावलीच घरी परत जावे लागले. शिवाय जिल्ह्यातील खासगी वाहतूक व ट्रॅव्हल्सच्या वाहतुकीवरही बंदी घालण्यात आली आहे.

कार्यालयात पाच टक्केच कर्मचारी

शासकीय कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी केवळ पाच टक्केच कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आदेश देण्यात आले. त्यानुसार जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, पंचायत समिती, तहसील, सहकार विभाग आदी कार्यालयात कर्मचाऱ्यांची गर्दी कमी दिसून आली. त्यांनीही दिवसभर मास्क लावूनच कामकाज केले.

यांना वगळले

वैद्यकीय सुविधा (सर्व प्रकारचे दुकाने, पॅथॉलॉजी, लेबॉरेटरी), अंत्यविधी, पोस्ट ऑफीस, दूरध्वनी, दूरसंचार व इंटरनेट सेवा देणारे कर्मचारी, पाणीपुरवठा सेवा, पेट्रोलियम कर्मचारी, स्वच्छता विषयक सेवा, बॅंकिंग व वित्तीय सेवा देणाऱ्या संस्था, प्रसार माध्यमे यांना 'लॉक आउट'मधून वगळण्यात आले आहे.


जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. 14 नागरिकांनी घराबाहेर निघू नये. केवळ अत्यावश्‍यक काम असेल तरच बाहेर यावे. आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुद्घ कडक कारवाई करण्यात येईल. वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षातील बेडची संख्या आता 32 करण्यात आली आहे.
-एम. देवेंद्र सिंह, जिल्हाधिकारी, यवतमाळ.


मागील दोन दिवसांत 188 नुसार 38 जणांवर जिल्ह्यात कारवाई करण्यात आली आहे. काल जनतेचा कर्फ्यू होता. त्यामुळे नागरिक स्वत:हून घरात होते. आजपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. जनतेच्या हितासाठी पोलिस प्रशासन रस्त्यावर उभे राहून काळजी घेत आहे.
-एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक, यवतमाळ.