
गुणदानाची यादी आक्षेप किंवा हरकतीसाठी शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली असून आक्षेप नसल्यास लवकरच आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्यांची घोषणा केली जाईल
अमरावती: आदर्श शिक्षक पुरस्काराबाबत शिक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली असून शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून पुरस्कारासाठी प्रस्ताव आलेल्या शिक्षकांना त्यांच्या कार्यानुसार गुणदान करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. 36 प्रस्तावानुरूप शिक्षकांना गुणदान करण्यात आले असून अधिक गुण असणारे शिक्षक आदर्श पुरस्कारासाठी पात्र ठरणार आहेत.
गुणदानाची यादी आक्षेप किंवा हरकतीसाठी शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली असून आक्षेप नसल्यास लवकरच आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्यांची घोषणा केली जाईल. त्यामुळे आदर्श शिक्षक पुरस्काराचे काउन्टडाउन सुरू झाल्याचे मानले जात आहे.
विशेष म्हणजे यावर्षी गुणदान केल्यानंतर त्याची यादी जाहीर करण्यात आल्याने संपूर्ण पारदर्शकता असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे. प्राथमिक विभागातून 14 तर माध्यमिक विभागातून दोन शिक्षकांना पुरस्कार देण्यात येणार आहे.
शिक्षकांकडून राबविण्यात आलेले शैक्षणिक व सामाजिक उपक्रम, वर्गाचा निकाल, लेखन, प्रगत विद्यार्थिसंख्या याबाबी गुणदान करताना लक्षात घेण्यात येतात. गुणदानाची प्रक्रिया आटोपली असून आता पुरस्कारप्राप्त शिक्षकांची अंतिम यादी तयार केली जाईल व त्यानंतर मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांकडे सोपविण्यात येईल.
वैशाली सरोदे 64 गुण (अंजनगावसुर्जी), बबलू कराडे 55 (अचलपूर), किशोर इंगळे 48 (अमरावती), मंगेश वाघमारे 32 (चांदूरबाजार), मनोज वानखडे 36 (चांदूररेल्वे), वैजनाथ इप्पर 37 (चिखलदरा), सचिन विटाळकर 64 (तिवसा), किशोर बुरघाटे 47 (दर्यापूर), उमेश आडे 83 (धामणगावरेल्वे), योगीता भुमर 84 (धारणी), अहमदखान पटेल 25 (नांदगावखंडेश्वर), लखन जाधव 64 (भातकुली), प्रियंका मनीष काळे 52 (मोर्शी), नंदकिशोर पाटील 35 (वरुड).
संपादन - अथर्व महांकाळ